राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील काँग्रेस मंत्री अस्लम शेख यांनी पुन्हा एकदा भाजपला लक्ष्य केलं आहे. छट पुजेच्या नावाखाली भाजप राजकारण करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
अस्लम शेख भाजपच्या राजकारणाला लक्ष्य करताना म्हणाले, मला भाजपच्या नेत्यांना प्रश्न विचारायचा आहे की, देशातून कोरोना विषाणू पूर्णपणे नष्ट झाला आहे का? कोरोनवर कुठली लस तयार झाली आहे का? देशात सर्वकाही सुरळीत झालं आहे का? या सगळ्यांचं उत्तर नाही असं असेल तर भाजपचे नेते पक्षाचा अजेंडा चालवण्यासाठी, धर्माच्या नावाखाली राजकारण करून लोकांच्या भावना भडकवण्याचं काम का करत आहेत?
त्यांच्या या राजकारणामुळे लाखो लोकांचा जीव दावणीला लागतोय याची त्यांना जराही काळजी नाही का?
जनतेच्या संयमाचं कौतुक करताना अस्लम शेख यांनी स्पष्ट केलं की, कोरोना संकटाच्या काळात जेवढे सण आले ते सगळे सण सर्वधर्मीयांनी अत्यंत संयमाने साजरे केले. तरीही भाजपचे नेते उगाच धर्माच्या नावाखाली का गोंधळ करत आहेत?
सध्याच्या स्थितीत कोरोनाशी लढा देणं ही आपली सगळ्याची प्राथमिकता असली पाहिजे. त्यामुळे धर्माच्या नावाखाली भाजपचे उगाच वातावरण खराब करू नये, अशी विनंती देखील अस्लम शेख यांनी केली आहे.
मुंबई महापालिकेने कोरोना प्रादुर्भावामुळे यावर्षी समुद्र किनाऱ्यांवर छट पूजा करण्यास बंदी घातली आहे. त्याचा भाजपकडून जोरदार विरोध करण्यात येत आहे.