मुंबईत कोरोनाचं प्रमाण नियंत्रणात आल्याचं म्हटलं जात आहे, असं आहे तर मृत्यूदर जास्त का आहे? मुंबईकरांमध्ये हार्ड इम्युनिटी तयार होत असल्याचं खरं असलं, तरी मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या कमी असण्यामागचं प्रमुख कारण कमी चाचण्या हेच आहे, असं म्हणत विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा मुंबई महापालिका आणि राज्य सरकारला कमी कोविड चाचण्यांवरून लक्ष्य केलं. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. (bjp leader devendra fadnavis ask question to maharashtra government over low covid 19 test in mumbai)
महाराष्ट्रातील कोरोनाच्या सद्यस्थितीबाबत भाष्य करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्रात कमी होत असलेल्या कोरोना चाचण्यांमुळे रुग्णसंख्या कमी दिसत आहे. दिल्लीतही कमी कोरोना चाचण्या होत होत्या. परंतु त्यांनी केंद्र सरकारची मदत घेतल्याने तिथं आता दिवसाला २८ ते ३० हजार कोरोना चाचण्या होत आहेत. त्यामुळे दिल्लीतील अॅक्टिव्ह केस कमी झाल्या असून महाराष्ट्रलाही कोरोना चाचण्या वाढवणं शक्य आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
हेही वाचा - ठाकरे सरकार की, लिव्ह इन रिलेशनशिप?- देवेंद्र फडणवीस
मुंबईतही रुग्णसंख्या कमी झाल्याचा दावा करण्यात येत आहे, मग मृत्यूदर जास्त कसा? असा माझा प्रश्न आहे. मुंबईतही कमी चाचण्या होत असल्याने रुग्णसंख्या घटल्याचं दिसत आहे. परंतु प्रत्यक्षात तसं नाही. येथील रेट आॅफ इन्फेक्शन १७ ते २० टक्के आहे. मुंबईतही कोरोना चाचण्या वाढवण्याची गरज आहे. मुंबईत दिवसाला १२ हजार चाचण्यांची क्षमता असतानाही केवळ ५ ते साडेपाच हजार चाचण्या होत आहे. भलेही या चाचण्या वाढवल्याने कोरोनाबाधितांची संख्याही वाढलेली दिसेल. परंतु भविष्यात परिस्थिती नियंत्रणात येईल. कोरोनाची दुसरी लाट आली नाही, तरच मुंबई यातून बाहेर पडेल, असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं.
राज्य सरकारने योग्य पुढाकार घेऊन ताकदीनीशी कोरोनाच्या संकटाशी मुकाबला करण्याची गरज आहे. सरकारने स्थापन केलेल्या समित्यांच्या शिफारशी स्वीकारुन अंमलबजावणी करण्याची गरज आहे. त्याला आज सुरूवात केली, तर पुढील २ महिन्यांमध्ये या शिफारशींचा परिणाम दिसायला लागेल, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
हेही वाचा - मुंबईत दररोज फक्त ४ हजार चाचण्या, देवेंद्र फडणवीसांचं मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र