तिकीट वाटपाबाबत एकनाथ खडसे यांना चुकीची माहिती मिळाली असून या चुकीच्या माहितीच्या आधारे आरोप करणं योग्य नसल्याचं म्हणत भाजप नेते गिरीश महाजन यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले.
हेही वाचा- ‘ती’ अनलकी केबिन एकाही मंत्र्याने का नाही घेतली?
विधानसभा निवडणुकीसाठी तिकीट वाटप होत असताना पक्षश्रेष्ठींचा हिरवा कंदील असूनही केवळ माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांनी तीव्र विरोध केल्याने माझं तिकीट कापण्यात आलं. माझी राजकीय कारकीर्द संपवण्यासाठी दोन्ही नेत्यांकडून जाणीवपूर्वक माझ्या नावाला विरोध करण्यात आला होता, असा आरोप एकनाथ खडसेंनी केला होता. भाजपच्या कोअर कमिटीतील मित्रांनीच मला ही माहिती दिल्याचं खडसे म्हणाले होते.
त्यावर प्रसारमाध्यमांनी प्रतिक्रीया विचारली असता, गिरीश महाजन म्हणाले. एकनाथ खडसे यांचा काहीतरी गैरसमज झाला आहे किंवा त्यांना चुकीची माहिती मिळाली आहे. चंद्रशेखर बावनकुळे, विनोद तावडे, राज पुरोहित, प्रकाश मेहता यांच्यासारख्या बड्या नेत्यांना तिकीट नाकारण्याचा निर्णय सर्वस्वी कोअर कमिटीच्या नेत्यांचा होता. उलट खडसेंच्या कन्या अॅड. रोहिणी खडसेंना पक्षाने तिकीट दिलं, हे त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. पुराव्यांशिवाय आमच्यावर असे निराधार आरोप करणे चुकीचं आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार या प्रकरणाची सखोल चौकशी झालीच पाहिजे.
हेही वाचा- जाचक अटींच्या पल्याड शिवभोजनाची ताटी