पूजा चव्हाण कथित आत्महत्या प्रकरणावरू विरोधी पक्ष असलेल्या भाजपकडून वनमंत्री संजय राठोड आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांना कोंडीत पकडण्याचा पुरेपूर प्रयत्न केला जात आहे. या प्रकरणात मुख्यमंत्री मौन पाळून का आहेत? असा सवाल करतानाच पोलीस चौकशी कशा रितीने सुरू आहे, हे मुख्यमंत्र्यांनी जनतेला सांगावं, अशी मागणी देखील केली जात आहे.
त्यातच भाजप नेते निलेश राणे यांनी देखील मुख्यमंत्र्यांवरच हल्लाबोल केला आहे. ठाकरे सरकार संजय राठोडला वाचवत आहे. सगळ्या बाजूने अडकलेले संजय राठोड शक्तिप्रदर्शन करतात, कॅबिनेट मीटिंगमध्ये बसतात, पण तरीही त्याचा राजीनामा घेण्याची हिंमत आणि धाडस मुख्यमंत्र्यामध्ये नाही... परत मुख्यमंत्र्यानी कधीही स्वतःच्या भाषणात म्हणू नये की ‘मी मर्द आहे’ असं ट्विट करत निलेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केलं आहे.
हेही वाचा- पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण: मुख्यमंत्र्यांची मूक संमती?, भाजपचा सवाल
ठाकरे सरकार संजय राठोडला वाचवतय. सगळ्या बाजूने अडकलेला संजय राठोड शक्तिप्रदर्शन करतो, कॅबिनेट मीटिंगमध्ये बसतो पण तरीही त्याचा राजीनामा घेण्याची हिंमत आणि धाडस मुख्यमंत्र्यामध्ये नाही... परत मुख्यमंत्र्यानी कधीही स्वतःच्या भाषणात म्हणू नये की ‘मी मर्द आहे‘
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) February 25, 2021
तर दुसरीकडे भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी गुरुवारी पुण्यात पूजा चव्हाणने ज्या इमारतीतून उडी मारून आत्महत्या केली, त्या इमारतीची पाहणी केली. त्यानंतर वानवडी पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. हे सरकार महाराष्ट्राच्या जनतेच्या डोळ्यात धूळ फेकत आहे. या घटनेच्या प्रत्यक्ष साक्षीदारांना यांनी सोडून दिलं आहे. प्रशासन पूर्णपणे हातावर हात धरून बसलं आहे. लाज वाटली पाहिजे यांना,” अशा शब्दांत चित्रा वाघ यांनी पोलीस स्थानकाबाहेर संताप व्यक्त केला.
त्याआधी भाजप आमदार आशिष शेलार (ashish shelar) यांनी पत्रकार परिषद घेऊन या आत्महत्या प्रकरणाच्या चौकशीवरून अनेक प्रश्न उपस्थित केले होते.
चौकशीनंतर बोलू असं मुख्यमंत्री म्हणत असतील तर आमचा त्यांना थेट सवाल आहे की चौकशी कुठल्या गुन्ह्याअंतर्गत केली जातेय हे स्पष्ट करावं, या गुन्ह्याची नोंद क्राइम रिपोर्ट म्हणून झाली आहे का की न नोंदवलेल्या गुन्ह्यांतर्गत होतेय याची स्पष्टता द्यावी, आतापर्यंत केलेल्या चौकशीत किती लोकांचे जबाब नोंदवलेत त्याची स्पष्टता द्यावी, या प्रकरणातील साक्षीदार संरक्षीत आहेत का की सत्तेत बसलेली लोकंच साक्षीदारांना पळवणे आणि धमकावण्याचे प्रकार करत आहेत? याचा खुलासा मुख्यमंत्र्यांनी करावा, अशी मागणी आशिष शेलार यांनी केली.
(bjp leader nilesh rane counter cm uddhav thackeray on pooja chavan suicide case)