मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तौंते चक्रीवादळामुळे नुकसानग्रस्त झालेल्या कोकणच्या दौऱ्यावर आलेले असताना विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते आणि भाजप आमदार प्रविण दरेकर यांनी या दौऱ्यावरून टीका केली आहे. मुख्यमंत्री अवघ्या ३ तासांत नुकसानीचा आढावा घेऊन दर्शनाचा कार्यक्रम करत असल्याचं दरेकर म्हणाले आहेत.
मागील तीन दिवसांपासून विधासभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रविण दरेकर कोकणातील नुकसानीची पाहणी करत फिरत आहेत. त्यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांवर टीका करताना दरेकर म्हणातात, कोकणात चक्रीवादळाने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी विरोधी पक्ष नेते तीन दिवसांपासून फिरत आहेत, तर मुख्यमंत्री अवघ्या ३ तासांसाठीच आले आहेत. विरोधी पक्ष नेते, कोकणवासीयांच्या बांधावर, उंबरठ्यावर जाऊन विचारपूस करत आहेत. तर मुख्यमंत्र्यांचा केवळ 'दर्शनाचा कार्यक्रम' सुरू आहे.
हेही वाचा- मी प्रत्यक्ष जमिनीवर उतरून पाहणी करतोय, उद्धव ठाकरेंचा मोदींवर निशाणा
कोकणात चक्रीवादळ नुकसानीची पाहणी!
— Pravin Darekar - प्रविण दरेकर (@mipravindarekar) May 21, 2021
विरोधी पक्ष नेते...
'तीन दिवस'
मुख्यमंत्री...
'तीन तास'
विरोधी पक्ष नेते,
कोकणवासीयांच्या बांधावर
उंबरठ्यावर जाऊन विचारपूस
मुख्यमंत्र्यांचा,
केवळ 'दर्शनाचा कार्यक्रम'
तर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी देखील याचप्रकारे मुख्यमंत्र्यांवर शेलक्या शब्दांत टीका केली आहे. देवेंद्रजी..काय राव तुम्ही थेट दुष्काळीभागात लोकांच्या मदतीला पोहोचता, मग इथं मुख्यमंत्र्यांनाही निघावं लागतं ना… ३ तासांच्या कोकणदौऱ्यात त्यांनी किती गावांना भेटी दिल्या कितींचं सात्वंन केलं, हे सगळ कृपा करून विचारू नका. आणि हो पर्यटन फोटोसेशन ३ तासांत शक्य नाही म्हणून रद्द केलंय, असं म्हणत चित्रा वाघ यांना या दौऱ्यावरून मुख्यमंत्र्यांना टोमणा मारला आहे.
त्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी देखील रोखठोक भाषेत उत्तर दिलं आहे. मी केवळ फोटोसेशन करायला आलेलो नाही, कोकणवासीयांना दिलासा देण्यासाठी मी आलो आहे. शिवाय मी हेलिकाॅप्टरमधून नाही, तर प्रत्यक्ष जमिनीवर उतरुन पाहणी करतोय, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजप नेत्यांसोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही निशाणा साधला.
तसंच तौंते चक्रीवादळाने जे नुकसान झालं आहे, त्याचे पंचनामे पूर्ण होताच संपूर्ण आढावा घेऊन नुकसानग्रस्तांना मदत करु. यात कोणीही वंचित राहणार नाही, अशी ग्वाही देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रत्नागिरी इथं दिली.
(bjp leader pravin darekar criticised maharashtra cm uddhav thackeray on his konkan visit after cyclone tauktae)