Advertisement

राजकीय चर्चा तर होणारच, चंद्रकांत पाटील यांनी वाढवलं ‘त्या’ भेटीमागचं गूढ

ते एकमेकांसोबत दोन ते अडीच तास असतील, तर ते नक्कीच चहा-बिस्कीटावर चर्चा करणार नाहीत, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

राजकीय चर्चा तर होणारच, चंद्रकांत पाटील यांनी वाढवलं ‘त्या’ भेटीमागचं गूढ
SHARES

जेव्हा दोन मोठ्या पक्षातील प्रमुख नेते एकमेकांना भेटत असतील, तेव्हा त्यांच्यात राजकीय चर्चा तर होणारच, असं म्हणत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना नेते खासदार संजय राऊत आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीतील गूढ वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. दोघांमधील भेट राजकीय नव्हती, तर केवळ सामनातील मुलाखतीसाठी चर्चा करण्यापुरतीच मर्यादीत होती, असं फडणवीस यांनी सांगूनही या तर्कवितर्कांना विराम लागू शकलेला नाही. (bjp maharashtra president chandrakant patil reacts on devendra fadnavis and sanjay raut meeting)

मुंबईत पत्रकारांशी या भेटीसंदर्भात बोलताना चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं की, जेव्हा दोन वेगळ्या पक्षातील वरच्या पातळीवरील नेते एकमेकांना भेटतात, तेव्हा त्यांच्यात राजकीय चर्चा ही होतेच. ते एकमेकांसोबत दोन ते अडीच तास असतील, तर ते नक्कीच चहा-बिस्कीटावर चर्चा करणार नाहीत. परंतु त्यातून काही निष्कर्ष निघालेला नाही.

हेही वाचा- राऊत, फडणवीस भेटीमागे ‘हे’ खरं कारण

 

राज्यात मध्यावधी निवडणुकांचा भूकंप कधीही होऊ शकताे. कोरोनामुळं सध्या संकटाची परिस्थिती आहे. अशा परिस्थितीत कुणालाही निवडणुका नको आहेत. मध्यावधी निवडणुका होऊ नये म्हणून सगळेच प्रयत्न करतील; पण शेवटी कोणाचीच समीकरणं जुळली नाहीत, तर अन्य पर्यायही समोर येऊ शकतो, असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी वेगळ्या राजकीय समीकरणाची शक्यताही यावेळी बोलून दाखवली. 

काही दिवसांपूर्वी सामना या वृत्तपत्रासाठी देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेण्याची इच्छा संजय राऊत यांनी बोलून दाखवली होती. तर ही मुलाखत अनएडिटेड व्हावी, असं मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं होतं. त्या मुलाखतीचं प्रारूप ठरवण्यासाठीच दोघांमध्ये ही भेट झाली. बिहार निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीस मुलाखतीसाठी संजय राऊत यांना वेळ देतील. दोघांमध्ये झालेल्या भेटीमागे कुठलाही राजकीय संदर्भ नाही, असा खुलासा या भेटीनंतर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला होता.

परंतु या गुप्त भेटीमुळे पुन्हा एकदा महाराष्ट्रातील राजकारणात उलथा पालथ होणार का? शिवसेना-भाजप सत्तेसाठी पुन्हा जवळ येणार का ? अशा चर्चा थांबवण्याचं नाव घेत नाहीत. त्यात चंद्रकांत पाटील यांनी आणखी भर घातली आहे.

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा