मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं दसरा मेळाव्यातलं कालचं भाषण म्हणजे कसलाही ताळमेळ नसलेलं, निर्बुद्ध आणि शिवराळ भाषण होतं. मुख्यमंत्र्यांच्या तोंडी अशी भाषा शोभत नाही. आजपर्यंत राज्यातील कोणत्याही मुख्यमंत्र्यांनी असं भाषण केलं नव्हतं. स्वतःला वाघ म्हणवणाऱ्या उद्धव ठाकरेंनी आजपर्यंत कुणाला कानाखाली तरी दिली आहे का? असा प्रश्न विचारत भाजप खासदार नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्या टीकेला उत्तर दिलं.
मुंबईतील भाजप कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेला उत्तर देण्यासाठीच ही पत्रकार परिषद घेतल्याचं नारायण राणे यांनी स्पष्ट केलं. यावेळी ते म्हणाले, अवघ्या ४७ शिवसैनिकांच्या भव्य मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी भाषण केलं. त्यांच्या भाषणात कोणत्याही प्रकारचा ताळमेळ नव्हता. दसरा मेळाव्यात केलेलं भाषण शिवराळ होतं. एका मुख्यमंत्र्यांच्या तोंडी शेण, गोमुत्राची भाषा शोभत नाही. माझ्या आयुष्यात महाराष्ट्राचे जे जे मुख्यमंत्री झाले. त्यांनी भाषण, विचार, काम व कार्याने स्वत:ची प्रतिष्ठा राज्यात व देशात राखली आणि वाढवली. याला अपवाद आताचे मुख्यमंत्री आहेत. उद्धव ठाकरे यांना काहीच कळत नाही. त्यांचा काहीच अभ्यास नाही. अधिकारीही त्यांच्यावर हसतात. (bjp mp narayan rane criticises maharashtra cm uddhav thackeray speech in shiv sena dussehra rally)
हेही वाचा - एका दिवसासाठी मुख्यमंत्री असल्याचं विसरा, होऊन जाऊ दे एकदा...
त्यांनी आजवर स्वत:च्या हिंमतीवर काहीही केलं नाही. मी ३९ वर्षे शिवसेनेत होतो, आमच्यासारख्या शिवसैनिकांनी त्यावेळी शिवसेना उभी केली. केसेस आम्ही अंगावर घेतल्या, स्वतःला वाघ म्हणवणाऱ्या उद्धव ठाकरेंनी कुणाला कानाखाली तरी दिली आहे का? वाघ पिंजऱ्यातला की पिंजऱ्याबाहेरचा? वाघाची भाषा करणारा, मला आणि माझ्या मुलांना बेडुक म्हणणारा हा माणूस पुळचट आणि शेळपट आहे. मातोश्रीच्या आतल्या गोष्टी आम्ही बाहेर काढल्या तर कपडे घेऊन पळायची वेळ येईल, असा उलटवार नारायण राणे यांनी केला.
आपल्या भाषणात शेतकऱ्यांचे प्रश्न, कोणत्याही योजना, कोरोनाचं संकट याबाबत काहीही भाष्य उद्धव ठाकरे यांनी केलं नाही. शेतकऱ्यांची दुरावस्था झालीय. शिक्षणाचा गोंधळ आहे. राज्याची अर्थव्यवस्था रसातळाला गेली आहे. कोरोनामुळे महाराष्ट्रात ४३ हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यावर बोलण्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांची नाही का? मुळात मुख्यमंत्री पदासाठी हा माणूस लायकच नाही. आज बाळासाहेब ठाकरे असते तर उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री केलं नसतं. महाराष्ट्राशी बेईमानी करुन हा माणूस मुख्यमंत्री झाला. मोदींचं नाव घेऊन निवडणूक जिंकली. ५६ जागा मिळूनही सेक्युलर पक्षांशी हातमिळवणी करत मुख्यमंत्रीपद मिळवलं. असा मुख्यमंत्री महाराष्ट्रात होणं म्हणजे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे, अशा शब्दांत नारायण राणेंनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली.