Advertisement

आता ‘त्यांचं’ही शुद्धीकरण करणार का?, भाजपचा शिवसेनेला खोचक प्रश्न

बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली देणाऱ्यांचंही शुद्धीकरण करणार का? असा प्रश्न भाजपने शिवसेनेला उद्देशून उपस्थित केला आहे.

आता ‘त्यांचं’ही शुद्धीकरण करणार का?, भाजपचा शिवसेनेला खोचक प्रश्न
SHARES

केंद्रीय मंत्री आणि भाजप खासदार नारायण राणे यांनी नुकतीच शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या दादार, शिवाजी पार्क येथील स्मृतीस्थळाला भेट दिली. या भेटीनंतर शिवसैनिकांकडून ‘गोमूत्र’ शिंपडून स्मृतीस्थळाचं शुद्धीकरण करण्यात आलं. मात्र याच प्रकार बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली देणाऱ्यांचंही शुद्धीकरण करणार का? असा प्रश्न भाजपने शिवसेनेला उद्देशून उपस्थित केला आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेतलं म्हणून त्या जागेचं शुद्धीकरण करण्यात आलं. उद्धव ठाकरे यांनी अबू आझमीशी हातमिळवणी करून आणि सोनिया गांधींसमोर नतमस्तक होऊन बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली आहे. मग त्यांचं पण शुद्धीकरण केलं जाणार का? असा प्रश्न भाजपने विचारला आहे.

हेही वाचा- अडवण्याची भाषा करणारे ‘गोमूत्र’वर आले, राणे बंधूंचं शिवसेनेला प्रत्युत्तर

तर, 'शुद्धीकरण' हे कोत्या मनाने होतं नसतं! वंदनीय बाळासाहेब सर्वांचे आहेत! सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसणाऱ्यांनी, आधी काँग्रेसला विचारायला पाहिजे होतं की 'गोमूत्र' शिंपडलं तर चालणार आहे का? असा टोला विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी लगावला.

सोबतच सत्तेच्या लालसेपोटी सोनिया गांधींच्या नावाने शपथ घेऊन काँग्रेस बरोबर सलगी केलेल्या आणि स्वर्गीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना जेलमध्ये टाकलेल्या छगन भुजबळांबरोबर सत्तेच्या लालसेपोटी सलगी करणाऱ्या शिवसेनेचीच शुद्धीकरण करण्याची गरज झाली आहे!, अशी प्रतिक्रिया भाजप आमदार आशिष शेलार यांनी दिली.

शिवसैनिकांच्या न जुमानला नारायण राणे जेव्हा शिवाजी पार्क इथं स्मृतीस्थळाला भेट देण्यासाठी गेले, तेव्हा त्यांना कुणाकडूनही विरोध झाला नाही. परंतु त्यानंतर शिवसैनिकांनी स्मृतीस्थळावर गोमुत्र शिंपडून, दुधाचा अभिषेक घातला. दुपारी नारायण राणे स्मृतीस्थळावर आले होते. त्यामुळे हा परिसर अशुद्ध झाला होता त्यामुळे स्मृतीस्थळाचं शुद्धीकरण केल्याचं आप्पा पाटील यांनी सांगितलं.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा