धारावी - मतदार नोंदणी कार्यालयाकडून बनावट पुरावे जोडलेले शेकडो अर्ज मंजूर झाल्याचा आरोप करत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी नायब तहसीलदारांना घेराव घातला. धारावी पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप केल्यानं वाद निवळला.
मंजूर अर्जांची फेरतपासणी करावी तसंच योग्य पुरावे नसलेले अर्ज रद्द करण्यात यावेत अशी शिवसैनिकांची मागणी होती. त्यानुसार शिवसेनेचे उपविभागप्रमुख मुत्तू तेवर आणि नगरसेवक राजेंद्र सूर्यवंशी यांनी नायब तहसीलदार नेहा चव्हाण यांना मतदार नावनोंदणीतील मंजूर अर्जांमधील चुका निदर्शनास आणून दिल्या. पुरावा म्हणून उत्तर प्रदेशातलं ड्रायव्हिंग लायसन्स, शिधापत्रकावर नावच नाही, विद्युत देयकावर दुसऱ्याच विभागातील पत्ता अशा अनेक त्रुटी निदर्शनास आणून देण्यात आल्या. दरम्यान, घटनास्थळी आलेल्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूर्यकांत बांगर यांनी कायदा सुव्यस्था बिघडू नये म्हणून सर्व आक्षेपार्ह अर्ज सील करा आणि आक्षेप घेणाऱ्यांच्या समक्ष अर्जासोबतच्या पुराव्यांची फेरतपासणी करा, असं नायब तहसीलदारांना सुचवलं.
'नायब तहसीलदारांनी मुदत संपल्यावरही अनेक अर्ज स्वीकारले आहेत. या अर्जांची फेरतपासणी आमच्या समक्ष न केल्यास नायब तहसीलदाराच्या कार्यालयाबाहेर धरणं देऊ,' असा इशारा शिवसेनेच्या उपविभागप्रमुखांनी दिला.
तर 'बूथ लेबल अधिकाऱ्यांकडून (बीएलओ) काही चुका झाल्या आहेत. मात्र मंजूर करण्यात आलेल्या सर्व अर्जांची फेरतपासणी करून सबळ पुरावे नसणारे सर्व अर्ज रद्द करण्यात येतील,' असं नायब तहसीलदार नेहा चव्हाण यांनी सांगितलं.