दादरमधील इंदू मिल येथे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) माध्यमातून उभारण्यात येणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक रखडले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 10 वर्षांपूर्वी स्मारकाचे भूमिपूजन केले होते. मात्र तरी स्मारकाच्या पूर्णत्वाची आंबेडकर अनुयायांची प्रतीक्षा संपताना दिसत नाही. स्मारकाचे आणि पुतळ्याचे काम पूर्ण होऊन स्मारक डिसेंबर 2026मध्ये खुले होईल, अशी माहिती सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी दिली.
पण इंदू मिल, दादर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक 2025 च्या अखेरीस पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे, असे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) च्या अधिकाऱ्यांनी सांगितले. डॉ. संजय मुखर्जी (IAS), MMRDA चे महानगर आयुक्त आणि विक्रम कुमार (IAS), अतिरिक्त आयुक्त-1, यांनी नुकतीच साइटला अधिकृत भेट देऊन प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा घेतला.
एमएमआरडीएकडून अंदाजे 1090 कोटी रुपये खर्च करत इंदू मिलच्या 4.84 हेक्टर जागेवर स्मारक बांधले जात आहे. या स्मारकाचे भूमिपूजन 2015 मध्ये पंतप्रधानांच्या हस्ते झाले. मात्र भूमिपूजनानंतर तीन वर्षांनी अर्थात 2018 मध्ये स्मारकाच्या प्रत्यक्ष कामास सुरुवात झाली. त्यानंतर 2021 पर्यंत स्मारक खुले होणे अपेक्षित होते. मात्र अत्यंत संथगतीने काम सुरू असल्याने अजूनही स्मारकाचे काम पूर्ण झालेले नाही.
डॉ. आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी इंदू मिलला भेट देत कामाचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी कामाचा वेग वाढविण्याचे आदेश दिले, तर स्मारकाचे 85 टक्के तर पुतळ्याचे 20 टक्के काम पूर्ण झाल्याची माहिती त्यांनी दिली.
हेही वाचा