औरंगाबाद जिल्हा परिषद निवडणुकीवरून एकमेकांसमोर आलेले शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे आणि राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्यातील वाद मिटवण्यात पक्षप्रमुखांना यश आले आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणूकीच्या तोंडावर या दोघांमधील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला होता. मात्र, रविवारी मंत्री अब्दुल सत्तार, मंत्री एकनाथ शिंदे व शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी मातोश्रीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली. या भेटीदरम्यान झालेल्या चर्चेनंतर खैरे-सत्तार यांच्या वादावर पडदा पडल्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
काही गोष्टींवरून आमच्यात मतभेद होते. मात्र मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हे सर्व मतभेद बाजूला ठेवून आम्ही एकत्र आलो आहोत. आता आमच्यातील वाद मिटलेला आहे. उद्धव ठाकरे यांना त्रास होईल असे वागायचं नाही असं ठरल्याचे चंद्रकांत खैरे म्हणाले. दोघेही पक्षसंघटना वाढवण्यासाठी काम करू. ते माझे मंत्री आहेत, मी त्यांचा नेता आहे. रागाच्या भरात सत्तार यांच्यावर टीका केली होती, पण आता सर्व ठीक असल्याचे खैरे म्हणाले. खैरेसाहेब हे आमचे नेते आहेत. दोघांमध्ये जे गैरसमज झाले होते ते दूर झालेत. उद्धव ठाकरे जे आदेश देतील त्याचे तंतोतंत पालन केले जाईल. तसेच शिवसेना मजबूत करण्यावर आता भर दिला जाईल असे मत अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केले. उद्धवजी जे आदेश देतील त्याप्रमाणे काम होईल. शिवसेनेला किंवा त्यांच्या उमेदवाराला दगाफटका होईल असे कोणतेही काम होणार नसल्याचे सत्तार म्हणाले. अल्पसंख्यांक समाज शिवसेनेशी कसा जोडेल यासाठी काम करेन. आता औरंगाबाद व संभाजीनगर एक झालेत, अशी प्रतिक्रिया राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली.
हेही वाचाः- मनसेला सर्व पर्याय खुले, नांदगावकरांनी दिले भाजपसोबत युतीचे संकेत?