मराठा आरक्षणावर ठोस उत्तर न मिळाल्यास ७ आॅगस्टपासून ठिय्या आंदोलन करण्याचा निर्धार सकल मराठा मोर्चाने जाहीर केला आहे. या आंदोलकांसमोर जाऊन सरकारची अारक्षणासंदर्भातील भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरूवारी भाजपा आमदारांना दिले. भाजपा आमदारांची बैठक वसंत स्मृती, दादर येथील भाजपा मुख्यालयात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी या सूचना केल्या.
सह्याद्री अतिथीगृह इथं मराठा समाजातील मान्यवरांसोबत झालेल्या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी सायंकाळी भाजपा आमदारांसोबतही बैठक घेतली. या बैठकीत सरकारची मराठा आरक्षणासंदर्भात काय भूमिका आहे? सरकार त्यासाठी काय उपाययोजना करत आहे, याची माहिती आंदोलकांना देण्याची जबाबदारी सर्व आमदारांवर टाकण्यात आली.
या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे म्हणाले, ''बैठकीत सर्व आमदारांनी मराठा आरक्षणासंदर्भात आपापली भूमिका मांडली. मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मागासवर्गीय आयोगाचा पाठपुरावा करून लवकरात लवकर अहवाल देण्याची सरकारने विनंती करावी, अशी मागणी करण्यात आली.
याचसोबत सरकारने जाहीर केलेली मेगा भरती रद्द करण्यात येऊ नये, कारण त्यामुळे इतर समाजातील उमेदवारांवर अन्याय होईल, काही उमेदवारांची वयोमर्यादा निघून गेल्यास त्यांचं नुकसान होईल, त्यामुळे मेगा भरतीत मराठा समाजातील उमेदवारांसाठी १६ टक्के जागा राखून ठेवत भरती प्रक्रिया सुरू ठेवण्याचं आवाहनही एकमताने करण्यात आलं.''
मराठा समाजासाठी सरकारच्या कुठल्या योजना आहेत? याची माहिती देण्यासाठी भाजपा आमदारांना आपल्या मतदारसंघात मदतकेंद्र सुरू करण्याचे निर्देशही या बैठकीत देण्यात आले आहेत.
हेही वाचा-
मराठा समाजाला कायद्याच्या कसोटीवर टिकणारं आरक्षण देणार- मुख्यमंत्री
राज्यात सरकार अस्तित्वात आहे का? हायकोर्टाचा खडा सवाल