मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी राज्य सरकारने सर्वकाही केलं. जे जे आवश्यक आहे, ते देखील देऊ, पण अजूनही केंद्राकडून मातृभाषेला तिष्ठत उभं ठेवण्यात आलं आहे. मराठी भाषा भिकारी आहे का? महाराष्ट्र भिकारी आहे का? असा प्रश्न विचारत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी केंद्र सरकारमुळेच मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा प्रश्न अडकून आल्याचा आरोप केला.
राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलताना उद्धव ठाकरे यांनी विरोधकांच्या आरोपांचा खरपूस समाचार घेतला. अभिजात भाषेच्या मुद्द्यावर बोलताना ते म्हणाले, दोन दिवसांपूर्वी मराठी भाषा गौरव दिन साजरा झाला. मुख्यमंत्री म्हणून माझा दुसरा मराठी भाषा गौरव दिन होता. आपण नेहमी म्हणतो मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देऊ, पण कोण देणार? आपल्याकडून सर्वकाही देण्यात आलेलं आहे. जे जे आवश्यक आहे, ते देखील देऊ, पण अजूनही केंद्राकडून मातृभाषेला दारात तिष्ठत उभं करण्यात आलं आहे. मराठी भाषा भिकारी आहे का? महाराष्ट्र भिकारी आहे का? की आम्ही हातात कटोरा घेऊन दिल्लीच्या दारात उभं आहोत?
हेही वाचा- “सुधीरभाऊंचं भाषण ऐकताना नटसम्राट बघितल्याचा भास झाला!”, उद्धव ठाकरेंचा टोमणा
मराठी ही छत्रपतींची भाषा आहे, याच भाषेमुळे आपले अस्तित्व आहे, अशा भाषेला तिचा मान न देणं हा करंटेपणा महाराष्ट्र कधीही विसरणार नाही. pic.twitter.com/cK8NAnxtG0
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) March 3, 2021
ही छत्रपतींची भाषा आहे. ती भाषा भिकारी असू शकत नाही. तुम्ही हिंदुत्व हिंदुत्व म्हणता ते पहिलं हिंदुत्व राज्य स्थापन करणाऱ्या छत्रपतींची ही मातृभाषा आहे. तुमची आमची भाषा आहे. छत्रपती नसते तर तुमचं आमचं सोडून द्या, जे दिल्लीत बसले ते तरी असते का? केंद्राचा हा करंटेपणा महाराष्ट्र कधीच विसरणार नाही, मराठी माती, मराठी माता हे विसरणार नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी केंद्रावर निशाणा साधला.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी राजकीय जोडे बाजूला ठेऊन एकत्र येण्याची तयारी दाखवल्याबद्दल कर्नाटकवासी मराठी बांधवांच्यावतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले. सोबतच कर्नाटक सरकार मराठी भाषिकांवर जी सक्ती करते ती मोडून तोडून काढू, असा निर्धार देखील मुख्यमंत्र्यांनी केला.
सुधीर मुनगंटीवार (sudhir mungantiwar) यांनी केलेल्या टीकेचा समाचार घेताना उद्धव ठाकरे यांनी सांगितलं, राष्ट्रपतींनी त्यांच्या भाषणात पंतप्रधान गरीब कल्याण योजनेत ८ महिन्यांसाठी ८० कोटी लोकांना मोफत धान्य दिल्याचे म्हटलं. म्हणजे हे सगळे गरीब लगेच श्रीमंत झाले का? या काळात पेट्रोल, गॅस, इंधन कोणतीही दरवाढ झालेली यांना चालते पण आमची कामे मात्र यांना खुपतात. आम्ही ५ रुपयांना शिवभोजन थाळी गरिबांना देऊन त्यांचं पोट भरतोय. त्यामुळे भरलेली थाळी आणि रिकामी थाळीतला फरक गरिबांना कळतो. रिकामी थाळी नाही वाजवत कोरोना घालवायला.
(cm uddhav thackeray criticised modi government on marathi language issue)