मुंबईचं महापौरपद पुन्हा एकदा खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित झालं आहे. २२ नोव्हेंबरला महापौरपदासाठी निवडणूक होणार आहे. संख्याबळानुसार शिवसेनेचा महापौर होणार हे निश्चीत आहे. मात्र, महापौरपद मिळवण्यासाठी शिवसेनेच्या जेष्ठ नेत्यांमध्ये स्पर्धा रंगणार आहे. यशवंत जाधव, किशोरी पेडणेकर, मंगेश सातमकर, आशीष चेंबूरकर या ज्येष्ठ नगरसेवकांची नावे महापौरपदासाठी चर्चेत आहेत.
मनसेच्या सहा नगरसेवकांनी प्रवेश केल्यानंतर शिवसेनेचे मुंबई महापालिकेतील बळ वाढले आहे. त्यामुळे शिवसेनेचे महापौरपद सध्या सुरक्षित आहे. पुन्हा खुल्या प्रवर्गासाठी महापौरपद आरक्षित झाल्याने इच्छुकांची यादी वाढली आहे. पक्षाचे सर्वात वजनदार नगरसेवक व मातोश्रीशी थेट संबंध असलेले स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांचं नाव यामध्ये आघाडीवर आहे. याशिवाय वरळी येथील ज्येष्ठ नगरसेवक आशिष चेंबूरकर, किशोरी पेडणेकर, माजी महापौर विशाखा राऊत, श्रद्धा जाधव, मंगेश सातमकर यांचीही नावे चर्चेत आहेत.
राज्यात शिवसेना आणि भाजपा युती तुटल्याने मुंबई महापालिकेतही ही युती राहण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे पालिकेत शिवसेनेसमोर मोठा विरोधी पक्ष उभा राहणार आहे. त्यामुळे शिवसेनेची भाजपाकडून कोंडी केली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापौरपद सक्षम नेत्याकडं सोपवणं शिवसेनेचा प्रयत्न असेल.
पालिकेतील पक्षीय बलाबल
शिवसेना : तीन अपक्षांसह ९४
भाजप : ८२ अधिक २
काँग्रेस : ३०
राष्ट्रवादी : ८
समाजवादी पक्ष : ६
एमआयएम : २
मनसे : १
हेही वाचा -
उद्धव ठाकरे -अहमद पटेल यांची बैठक झालीच नाही; अफवा पसरवणं बंद करा - संजय राऊत
शिवसेनेनेही वारंवार मुख्यमंत्रीपदाबद्दल भाष्य केलं - संजय राऊत