पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाकडून वारंवार आचारसंहितेचा भंग करण्यात आल्याने त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने निवडणूक आयोगाकडे केली.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या शिष्टमंडळाने मंगळवारी दिल्लीतील केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पालघर लोकसभा पोटनिवडणुकीसंदर्भात तक्रार दाखल केली. मुख्य निवडणूक आयुक्त ओ. पी. रावत, निवडणूक आयुक्त अशोक लवासा व सुनील अरोरा यांच्यासह संपूर्ण निवडणूक आयोगाने काँग्रेस शिष्टमंडळाचं म्हणणं ऐकून घेतलं.
या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना सावंत म्हणाले की, पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत सत्ताधारी भाजपाकडून सत्ता आणि पैशांचा गैरवापर करण्यात आला. भाजप उमेदवाराने निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या खर्चाच्या मर्यादेपेक्षा दुप्पट खर्च केला आहे. स्थानिक अधिकाऱ्यांवर आमचा विश्वास राहिलेला नाही. त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगानेच यात लक्ष घालून कारवाई करावी.
काँग्रेस शिष्टमंडळाने उपस्थित केलेल्या सर्व ७ मुद्द्यांचे गांभीर्य ओळखून त्यावर उचित कारवाई होईल, असे निवडणूक आयोगातर्फे स्पष्ट करण्यात आलं आहे. भाजपा उमेदवाराने केलेल्या खर्चाचं विवरणपत्र उपलब्ध करून दिलं जाईल, असंही आयोगाने स्पष्ट केल्याचं सावंत म्हणाले.
हेही वाचा-
अमित शाह उद्धव ठाकरेंच्या भेटीला, युतीसाठी चर्चा होण्याची शक्यता
शिवसेना असो वा नसो, कामाला लागा, मुख्यमंत्र्यांचं कार्यकर्त्यांना अावाहन