Advertisement

बिहारला मोफत कोरोना लस, मग महाराष्ट्राचं काय?- बाळासाहेब थोरात

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी भाजपच्या बिहारसाठी मोफत कोरोना लशीच्या आश्वासनाचा समाचार घेतला.

बिहारला मोफत कोरोना लस, मग महाराष्ट्राचं काय?- बाळासाहेब थोरात
SHARES

बिहारमध्ये निवडणुका होत असल्याने तिकडच्या रहिवाशांना मोफत कोरोना लस देणार, तर मग महाराष्ट्र आणि इतर राज्यांना लस कधी मिळणार? की त्यासाठीही सर्वसामान्यांना पैसे मोजावे लागणार? असे प्रश्न विचारत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी भाजपच्या बिहारसाठी मोफत कोरोना लशीच्या आश्वासनाचा समाचार घेतला.

बिहारमध्ये होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने तेथील रहिवाशांना मोफत कोरोना लस उपलब्ध करून देण्याचं आश्वासन जाहिरनाम्यात दिलं आहे. यावरून काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांकडून भाजपवर जोरदार टीका करण्यात येत आहे. यावर प्रतिक्रिया देताना बाळासाहेब थोरात म्हणाले, देशात काय, तर जगात अजूनही कोरोनाची लस उपलब्ध झालेली नाही. त्यात आधीच कोरोनाने भयभीत असलेल्या जनतेला मोफत लस देण्याचं गाजर दाखवणं हा भाजपने ताळतंत्र सोडल्याचा पुरावा आहे. (congress leader balasaheb thorat slams bjp over free covid 19 vaccine assurance in bihar assembly election 2020)

निवडणुका आल्या की वारेमाप घोषणा करण्याचा रोग भाजपाला जडला आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत बिहारला १.२५ लाख कोटी रुपयांचे पॅकेज देण्याची घोषणा पंतप्रधान मोदी यांनी केली होती, त्या पॅकजचे काय झालं? याचा अनुभव बिहारच्या जनतेला आलाच असेल. मुंबई महापालिका निवडणुकीच्यावेळीही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिलमधील स्मारकाचं भूमिपूजन करण्यात आलं त्याचं काय? ही सगळी भाजपची जुमलेबाजी असल्याचं बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं.

हेही वाचा- “आधी महाराष्ट्राच्या हक्काचा जीएसटीचा पैसा आणा”

निवडणूक जाहिरनाम्यात मोफत कोरोना लस देण्याचा उल्लेख कशासाठी? केवळ बिहारच्या जनतेलाच मोफत लस मिळणार आहे का? इतर राज्यांना त्यासाठी पैसे खर्च करावे लागणार आहेत का? प्रत्येक भारतीयाला कोरोनाची लस मोफत मिळणे हा त्यांचा अधिकार आहे, तो त्यांना मिळालाच पाहिजे, अशी मागणी देखील बाळासाहेब थोरात यांनी केली.

तर, सर्व भारतीयांना कोरोना विरोधी लस रास्त आणि न्याय्य पद्धतीने देण्याचं नियोजन करण्याऐवजी भाजपने बिहार निवडणुकीसाठीच्या जाहीरनाम्यात लसीचं राजकारण केलं आहे. महामारीच्या काळातसुद्धा राजकीय फायद्याकरिता एका राज्याला विशेष वागणूक देणं पूर्णपणे अन्यायकारक, बेकायदेशीर आणि अमानुष आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा