पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २ वर्षांपूर्वी, ८ नोव्हेंबर २०१७ च्या रात्री नोटाबंदी जाहीर करत नागरिकांना मोठा झटका दिला होता. काळ्या पैशांना आळा घालण्यासाठी नोटाबंदी लागू करण्यात आली, पण हे उद्दीष्ट साध्य झालं नाहीच; उलट देशाची अर्थव्यवस्था डळमळीत केल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे. या आरोपावरून गेल्या २ वर्षांपासून विरोधक
पंतप्रधान मोदींना घेरताना दिसत आहेत. त्यामुळेच २ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने काँग्रेसने भाजपाविरोधात मुंबईत जोरदार आंदोलन केलं. मोदी-अमित शाह या जोडगोळीला आता देशातील जनता कंटाळली असून, त्यांचा खरा चेहरा जनतेसमोर आला आहे. त्यामुळे उन्होने नोट बदले, हम पीएम बदलेंगे असा संकल्प काँग्रेसकडून करण्यात आल्याचं यावेळी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरूपम यांनी जाहीर केलं.
नोटबंदीला २ वर्ष पूर्ण झाल्याच्यानिमित्तानं मुंबई काँग्रेसकडून शुक्रवारी सकाळी ११ वाजता सीएसएमटी ते आझाद मैदान असा मोर्चा काढत काळा दिवस म्हणून नोटबंदीचा दिवस पाळण्यात आला. यावेळी निरूपम यांच्यासमवेत काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. गेल्या २ वर्षांत नोटबंदीमुळं मुंबईसह देशात निर्माण झालेली परिस्थिती पाहता नोटाबंदी साफ फोल ठरली आहे. व्यापार्यांना, शेतकऱ्यांना आणि सामान्य नागरिकांना नोटबंदीचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळं आता मोदी-शाहांना राजकारणातूनच हटवणं हेच मिशन असल्याचं म्हणत आता त्यांना टाटा बाय-बाय करण्याची वेळ असल्याचा टोला निरूपम यांनी लगावला आहे.
नोटबंदीला ६०० दिवस पूर्ण झाली तरी नोटबंदीवरून मोदींची आळीमिळी गुपचिळीच आहे. नोटबंदी केल्यानंतर ५० दिवसांत काळं धन भारतात आणू अन्यथा मला फासावर लटकवावा असं मोदींनी जाहीर केलं होतं. आता ६०० दिवसांनंतरही नोटबंदीचा फटका देशाला, जनतेला, व्यापाऱ्यांना बसत असून काळं धन काही भारतात आलेलं नाही. त्यामुळं मोदींची राजकीय हत्या आता देशातील जनताच २०१९ मध्ये करेल, असं म्हणत निरूपम यांनी मोदी-शाहांवर जोरदार हल्ला चढवला.
हेही वाचा-
भारतमाता पुन्हा ओवाळणार नाही... राज ठाकरेंची आतिषबाजी
प्लास्टिकबंदीवर बोलू, प्लास्टिकवर नंतर बोलू; आदित्य ठाकरेंचा निरूपम यांना टोला