मला अनेक पक्षांकडून पक्ष प्रवेशाच्या आॅफर येत आहेत. परंतु त्यासंदर्भातील निर्णय कोरोनाचं संकट दूर झाल्यानंतर घेईन, असं म्हणत भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (bjp leader eknath khadse) यांनी भाजपला सोडचिठ्ठी देण्याचे संकेत दिले. राज्यसभेपाठोपाठ विधान परिषदेचीही (vidhan parishad election) उमेदवारी नाकारण्यात आल्याने खडसे सध्या नाराज आहेत.
शिफारस करूनही
आपल्या भावनांना मोकळी वाट करून देताना एकनाथ खडसे म्हणाले की, विधान परिषदेसाठी माझ्या नावाची शिफारस करण्यात आली होती. पण ज्यांचा पक्षाशी संबंध नाही किंवा ज्या व्यक्तींनी पक्षविरोधी कामे केली आहेत त्यांना संधी देण्यात आली आहे. मला संधी दिली नाही तरी ठीक आहे. पण विधान परिषदेचं तिकीट मिळेल या अपेक्षेने पक्षात अनेकजण कित्येक वर्षांपासून निष्ठेने काम करत आहेत. माधव भांडारी, केशव उपाध्ये, अवधूत वाघ यांच्यासारखे बरेच कार्यकर्ते आहेत. त्यांना चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांनी तिकीट मिळवून देण्याची गरज हाेती.
हेही वाचा - खडसे, मुडेंना पुन्हा डावललं, भाजपने केली विधान परिषदेच्या उमेदवारांची घोषणा
इतर पक्षांची विचारणा
भाजपच्या असंख्य कार्यकर्ते, नेत्यांचे मला फोन येत आहेत. तुमच्यावर अन्याय होत आहे, तुम्ही निर्णय घ्या अशी विनंती करत आहेत. काही पक्षही आपल्याकडे यावं यासाठी विचारणा करत आहेत. पण कोरोनासारख्या गंभीर स्थितीत राजकीय विचार करणं योग्य ठरणार नाही. त्यामुळे आपल्यासोबत असलेल्या कार्यकर्त्यांशी चर्चा करुन योग्य वेळी निर्णय घेईल, असं एकनाथ खडसे म्हणाले.
पक्षविरोधकांना संधी
याआधी, परिषदेच्या उमेदवारीसाठी माझ्यासह पंकजा मुंडे आणि बावनकुळे यांचं नाव दिल्लीला पाठवण्यात आल्याचं मला सांगण्यात आलं होतं. पण आता वेगळीच नावं समोर आली आहेत. त्यात धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर आहेत. याच पडळकर यांनी लोकसभेच्या निवडणुकीत पक्षाच्या विरोधात प्रचार केला होता. 'मोदी गो बॅक' अशा घोषणा दिल्या होत्या. त्यांच्यासोबत अनेक वर्षे राष्ट्रवादीत असलेल्या मोहिते-पाटलांना संधी दिली आहे.
याउलट मी ४० ते ४२ वर्षे एकनिष्ठ राहून भाजपचं काम करतोय. पक्ष वाढवताना अनेक कठीण प्रसंगांचा सामना केला. चढउतार पाहिले. मला संधी मिळेल अशी अपेक्षा होती. पण पक्षाला शिव्या घालणाऱ्यांना मान दिला गेला. भाजप कोणत्या दिशेनं चाललाय, यावर आता चिंतन करण्याची गरज आहे, अशी खंत खडसे यांनी व्यक्त केली होती.
हेही वाचा - उद्धव ठाकरेंनी भरला उमेदवारी अर्ज, मुख्यमंत्रीपदावरची टांगती तलवार दूर
यांना उमेदवारी
भाजपने एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे यांना डावलून भाजपाच्या केंद्रीय समितीने नागपूरचे माजी महापौर प्रवीण दटके , डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ. अजित गोपछडे, माजी आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील आणि गोपीचंद पडळकर या चौघांना विधान परिषदेची उमेदवारी दिली आहे.