Advertisement

अंगणवाडी सेविका, होमगार्ड्सना मदतीसाठी तयार ठेवा, मुख्यमंत्र्यांच्या प्रशासनाला सूचना

आरोग्य व्यवस्थेवरील ताण कमी करण्यासाठी अंगणवाडी सेविका आणि होमगार्ड्स (homeguards and anganwadi sevika) यांना प्रशिक्षित करून त्यांना मदतीसाठी तयार ठेवण्याचे निर्देश राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.

अंगणवाडी सेविका, होमगार्ड्सना मदतीसाठी तयार ठेवा, मुख्यमंत्र्यांच्या प्रशासनाला सूचना
SHARES

राज्यात कोरोनाचा (coronavirus) प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून या विषाणूशी लढा देण्यासाठी राज्यातील ठिकठिकाणचे डाॅक्टर, नर्स आणि इतर वैद्यकीय कर्मचारी दिवसरात्र मेहनत घेत आहेत. अशा परिस्थितीत त्यांच्यावरील ताण कमी करण्याच्या उद्देशाने अंगणवाडी सेविका आणि होमगार्ड्स (homeguards and anganwadi sevika) यांना प्रशिक्षित करून त्यांना मदतीसाठी तयार ठेवण्याचे निर्देश राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm uddhav thackeray) यांनी प्रशासनाला दिले आहेत.

राज्यात लाॅकडाऊन करण्यात आलेलं असताना देखील कोरोनाबाधितांचा वाढणारा आकडा प्रशासनासाठी चिंतेचा विषय ठरू लागला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाॅकडाऊनची घोषणा करण्याआधीच महाराष्ट्रात लाॅकडाऊन करण्यास सुरूवात झाली होती. सर्वांना खबरदारीचे आणि नियम पाळण्याचे आदेश देण्यात आले होते. अत्यावश्यक सेवांतील कर्मचारी वगळता सर्वसामान्यांना घराबाहेर पडण्यास मनाई करण्यात आली. असं असून देखील राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा ३३५ वर जाऊन पोहोचला आहे. त्यात मुंबईतील रुग्णांची संख्या देखील १८१ वर गेली आहे. 

तर दुसऱ्या बाजूला राज्यातील विविध रुग्णालयांत दाखल असलेल्या कोरोनाबाधितांवर उपचार करून त्यांचा जीव वाचवण्यासाठी तेथील डाॅक्टर, नर्स (doctors and nurse) आणि इतर वैद्यकीय कर्मचारी दिवसरात्र सेवा देत आहेत. रुग्णांच्या वाढत्या संख्येसोबतच राज्याच्या आरोग्य व्यवस्थेवरील ताणही वाढतच चालला आहे. पुरेसं अन्नपाणी, पुरेशी झोप न घेताच रुग्णांवर उपचार करणाऱ्या कर्मचाऱ्यांचेही आता हाल होऊ लागले आहेत. त्यांनाही विश्रांतीची गरज भासू लागली आहे. एवढंच काय तर काही डाॅक्टर, नर्सेसलाही कोरोनाची लागण झाल्याने त्यांच्यावरही उपचार करण्याची वेळ आली आहे.

अशा स्थितीत त्यांच्यावरील भार हलका करण्याच्या उद्देशाने अंगणवाडी सेविका आणि होमगार्ड्स यांना प्रशिक्षण देऊन त्यांना आरोग्य सेवेत मदतीसाठी पाठवण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. त्यानुसार लवकरच अंगणवाडी सेविका आणि होमगार्ड्स यांना या सेवेसाठी जावं लागणार आहे.  


Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा