भाड्याच्या घरात राहणाऱ्या भाडेकरूंना (house rent) मोठा दिलासा देत घरभाडे वसुली किमान ३ महिने पुढे ढकलण्याची सूचना राज्य सरकारने घरमालकांना केली आहे. तसंच घरभाडं भरलं नाही म्हणून किंवा घरभाडं थकल्याने कुणालाही घराबाहेर काढू नये, असे निर्देशही गृहनिर्माण विभागाने (housing department) राज्यभरातील घरमालकांना दिले आहेत.
घराचं बजेट कोलमडलं
कोरोनाचा (coronavirus) संसर्ग वाढू नये म्हणून केंद्र तसंच राज्य सरकारने मे महिन्यापर्यंत लाॅकडाऊन (lockdown) वाढवला आहे. सद्यस्थितीत आपत्कालीन सेवा वगळता सर्व उद्योगधंदे, व्यवसाय, आॅफिस बंद आहेत. कोरोनाचा फैलाव न झालेल्या ग्रामीण भागातील काही उद्योगधंदे २० एप्रिलनंतर सुरू होण्याचे संकेत आहेत. तरी याचा रोजगारावर मोठा परिणाम झाल्याने सर्वसामान्यांचं बजेट कोलमडलं आहे. बहुतांश लोकांकडे तर खर्च करण्यासाठीही पैसे नाहीत. अशा स्थितीत अनेकांना घर कसं चालवायचं? आपल्या कर्जाचे हप्ते फेडायचे कसे? याचसोबत भाड्याच्या घरात राहणाऱ्या भाडेकरूंना घरभाडं (lease) कसं द्यायचं ही चिंता देखील सतावू लागली आहे. त्यावर राज्याच्या गृहनिर्माण विभागाने उत्तर शोधलं आहे.
हेही वाचा - २० एप्रिलनंतर ‘या’ अटींवर सुरू होणार महाराष्ट्रातील उद्योग
#Lokdown
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) April 17, 2020
भाड्याच्या घरात राहणाऱ्यांना शासनाचा दिलासा : घरभाडे वसुली किमान तीन महिने पुढे ढकलावी, घरभाडे भरले नाही म्हणून किंवा घरभाडे थकल्याने कुणालाही घराबाहेर काढू नये- गृहनिर्माण विभागाच्या राज्यातील घरमालकांना सूचना pic.twitter.com/4SVhhgRDN3
सर्वसामान्यांच्या रोजगारावर परिणाम
गृहनिर्माण विभागाचे अपर मुख्य सचिव संजय कुमार यांनी १७ एप्रिल रोजी घर मालकांना (house owner) उद्देशून एक परिपत्रक जारी केलं आहे. या परिपत्रकात म्हटलं आहे की, जगात पसरलेल्या कोविड-१९ साथीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात २३ मार्च २०२० पासून लाॅकडाऊन जाहीर करण्यात आलं असून ते ३ मे २०२० पर्यंत कायम राहणार आहे. लाॅकडाऊनमुळे सर्व व्यावसायिक संस्था, बाजारपेठा, कारखाने व एकूणच सर्व आर्थिक/व्यावसायिक व्यवहार बंद आहेत. याचा सर्वसामान्य जनतेच्या रोजगारावरही परिणाम झाला असून अनेकांच्या उदरनिर्वाहाचं साधन बंद झालं आहे. यामुळे सर्वसामान्यांना कोरोना व्हायरसच्या साथीसोबतच आर्थिक समस्यांनाही तोंड द्यावं लागत आहे.
घरातून बाहेर काढू नका
राज्यात भाड्याच्या घरात राहणाऱ्या लोकांचं प्रमाण लक्षणीय असून वर नमूद आर्थिक अडचणीमुळे भाडेकरूंना ते राहात असलेल्या घराचं भाडं नियमितरित्या भरणं शक्य होत नाही किंवा ते थकत आहे, ही वस्तुस्थिती आहे.
अशा बिकट आर्थिक परिस्थितीत घरभाडे वसुली किमान ३ महिने पुढं ढकलावी व या कालावधीत भाडेकरूकडून भाडं थकल्यास त्यांना घरातून बाहेर काढू नये, अशा सूचना राज्यातील सर्व घरमालकांना देण्यात येत आहेत.
सरकारकडून निघालेल्या या परिपत्रकामुळे घरमालकांकडून जर काही भाडेकरूंकडे भाडेवसुलीची सक्ती होत असेल किंवा त्यांना भाडं न दिल्यास घरातून बाहेर काढण्याचा प्रयत्न होत असेल, तर हे प्रकार थांबण्यास मदत होईल.