राज्याचे माजी महसूल मंत्री आणि भारतीय जनता पार्टीचे नेते एकनाथ खडसे ज्या न्यायाच्या प्रतिक्षेत आहेत, तो न्याय त्यांना मिळेल. मात्र त्यासाठी खडसे यांना 'योग्य वेळ येण्याची' वाट पहावी लागणार आहे. खुद्द महाराष्ट्र भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी हे संकेत दिले आहेत. योग्य वेळ आल्यानंतर आणि चौकशी संपल्यानंतर एकनाथ खडसे यांना न्याय मिळेल, अशी प्रतिक्रिया रावसाहेब दानवे यांनी दिली आहे. मात्र न्याय मिळणार म्हणजे नेमकंं काय होणार? खडसे यांनी गमावलेलं मंत्रिपद त्यांना पुन्हा मिळणार? की एमआयडीसीच्या जमिन खरेदी घोटाळा प्रकरणात भ्रष्टाचारांच्या आरोपांमुळे डागाळलेलं चारित्र्य घेऊन पुढचा राजकीय प्रवास करावा लागणार? हे सांगणं मात्र दानवे यांनी खुबीनं टाळलं. "मला एक न्याय आणि बाकीच्यांना वेगळा न्याय का? मला कधी न्याय मिळेल?" एकनाथ खडसे यांनी विचारलेल्या या प्रश्नांना दानवे यांनी माध्यमांमार्फत उत्तर दिलं आहे.
भोसरीमधल्या एमआयडीसीच्या जमिन खरेदी व्यवहारात कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याच्या आरोपानंतर एकनाथ खडसे यांना मंत्रिपदावरून पायउतार व्हावं लागलं होतं. खडसे यांनी त्यानंतर अनेकदा मुख्यमंत्र्यांसह भाजपातल्या नेत्यांवर शरसंधान केलं. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात विधानसभेतल्या आपल्या आक्रमक शैलीतल्या भाषणांमधून त्यांनी स्वपक्षाच्याच सरकारला घरचा आहेर दिला. भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून राज्याचे गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी देऊ केलेले राजीनामे मुख्यमंत्र्यांनी स्वीकारले नाहीत. या पार्श्वभूमीवर स्वतःवर अन्याय झाल्याची खडसे यांची भावना प्रबळ झाली. याच उद्विग्नतेतून त्यांनी स्वतःला न्याय मिळत नसल्याची तक्रारही केली. आता प्रश्न असा आहे की, खडसे यांना न्याय मिळवून देण्याचं आश्वासन देणाऱ्या रावसाहेब दानवे यांचंतरी प्रदेशाध्यक्षपद सुरक्षित आहे का? भाजपाच्या एकदिवसीय राज्य कार्यकारिणीत केलेल्या भाषणात जरी देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचं मुख्यमंत्रीपद आणि रावसाहेब दानवे यांंचं प्रदेशाध्यक्षपद सुरक्षित असल्याचा दावाकेला आहे. अगदी अशाच प्रकारचा दावा खडसे यांच्या मंत्रिपदाबाबतसुद्धा केला जात होता. पण त्यांचं मंत्रिपद गेलंच.
मंत्रिपद गेल्यानंतर सातत्यानं सरकारविरोधात वक्तव्यं करणारे एकनाथ खडसे मंत्रिपदावर पुनरागमनाच्या शक्यतेनं मध्यंतरीच्या काळात सरकारचे, विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांचे गुणगान करायला लागले होते. पण मंत्रिपदावर पुनर्वसन होत नाही, हे लक्षात आल्यावर त्यांनी पुन्हा ट्रॅक बदलला. राज्य कार्यकारिणीच्या बैठकीतसु्द्धा खडसे यांचा हाच नूर दिसला.
राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत अलिप्तपणे वावरणाऱ्या एकनाथ खडसे यांच्या चेहऱ्यावर भाजपाच्या कार्यकर्त्यांनी मात्र स्मितहास्य आणलं. बोरिवलीमधील भाजपा प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीला उपस्थित असलेले खडसे संध्याकाळी बैठक संपल्यानंतर निघत असताना पक्षाचे युवा कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी त्यांना गाठत त्यांच्यासोबत सेल्फी काढला. निघण्याच्या तयारीत असलेल्या अनेक नेत्यांना हे दृश्य पाहून हेवा वाटल्यावाचून राहिला नसेल. यानिमित्ताने नाथाभाऊंची क्रेझ युवा वर्गात कायम असल्याचं पहायला मिळालं.