केंद्रात सरकार आल्यास मुंबईतील प्रत्येक झोपडपट्टी धारकांना ५००चौ. फूटाचे पक्के घर देऊ असे आश्वासन राहुल गांधी यांनी दिले होते. केंद्रात नाही मात्र राज्यात सत्ता आल्यानंतर काँग्रेसचे वस्त्रउद्योग, मत्सव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांनी ही मागणी आता उचलून धरत तसे पत्रच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले आहे.
एप्रिल महिन्यात राहुल गांधी यांनी प्रचारा दरम्यान ट्विटवरून ‘१ मार्च रोजी मुंबईच्या सभेत सर्व सामान्यांना ५०० चौरस फूटाचे पक्के घर देण्याच्या काँग्रेसच्या प्रस्तावाला माझे समर्थन आहे. मी मुंबईकरांना आश्वासन देतो की, काँग्रेसचे सरकार सत्तेत आल्यावर आम्ही झोपडपट्टी धारकांना आणि भाडेकरूंना हक्काचे घर देऊ असे आश्वासन दिले होते. सध्या केंद्रात नाही. मात्र राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. त्यामुळे राहुल गांधी यांनी दिलेल्या आश्वसनची पूर्तता करण्यासाठी वस्त्रउद्योग मंत्री अस्लम शेख यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे.
त्या पत्रात कॅबिनेट मंत्री अस्लम शेख यांनी मुंबईत मोठ्या प्रमाणात झोपड्यांचे पूर्नविकास प्रकल्प रखडलेले आहेत. तर काही ठिकाणी पूर्नविकास पूर्ण झालेल्या इमारतीतील सदनिका सरासरी ५ व्यक्तींना अपुरी पडत आहे. त्यामुळे झोपडपट्टी धारकांना ५०० चौ.फूटाच्या सदनिका मंजूर झाल्यास पात्र झोपडपट्टी धारकांचे राहणीमान उंचावण्यास मदत होईल अशी मागणी अस्लम शेख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देण्यात आलेल्या पत्रात केली आहे.