मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी वरळीत (Worli) प्रचारसभा घेताना मोठं आश्वासन दिलं आहे. राज ठाकरे यांनी थेट फतवाच काढला असून, थेट मंचावरून ही घोषणा केली आहे.
सत्ता दिल्यास 48 तासात मशिदींवरील भोंगे काढून टाकेन असं राज ठाकरेंनी जाहीर केलं आहे. शिवसेनेबद्दल मौलवी फतवा काढतात असा संतापही त्यांनी व्यक्त केला. मनसेने वरळीतून आदित्य ठाकरेंविरोधात (Aditya Thackeray) संदीप देशपांडे (Sandip Deshpande) यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
'उद्धव ठाकरेंसाठी मौलवी फतवे काढतात'
"उद्धव ठाकरे मुख्यमंत्री कसे झाले हे तुम्हाला माहित आहे. विचारधारा नावाची काही गोष्ट नाही. 2019 मध्ये निवडणुका झाल्यानंतर सगळ्यांनी आपापल्या अब्रू बाजूला ठेवल्या. एके दिवशी सकाळी सहा वाजता अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस शपथ घेत आहेत. अर्धा तास लग्न टिकलं आणि घटस्फोट झाला.
घटस्फोट झाल्या झाल्या उद्धव ठाकरे यांनी बघितलं आपल्याला कोण कोण डोळा मारत आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्ष नको म्हणून लोकांनी शिवसेना आणि भाजपला मतदान केलं किंवा शिवसेना भाजप नको म्हणून काँग्रेस राष्ट्रवादीला काही लोकांनी मतदान केलं.
पण भाजप आणि राष्ट्रवादी यांचा शपथविधी आधी होतो. मग त्यातली एक उठते आणि उरलेल्या दोघांबरोबर संसार करायला लागते. जनाची नाही कशाशी लाज नाही," अशी टीका राज ठाकरेंनी केली.
"उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतरची अडीच वर्ष बघा. त्या अडीच वर्षांमध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या नावापुढील हिंदूह्रदयसम्राट काढून टाकलं. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला वाईट वाटेल, मुस्लिम मतं जातील म्हणून त्यांनी ते काढून टाकलं. काही होर्डिंगवरती हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या ऐवजी जनाब लिहिलं होतं.
आज ते हयात असायला हवे होते, फोडून काढले असते एकेकाला. आज त्याच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेबद्दल मौलवी फतवा काढतात. फतवा काढतात की सगळ्या मुस्लिमांनी एकत्र यावं आपली मतं फुटू नये. आणि सगळी मतं महाविकास आघाडीच्या पारड्यात टाकावी असं फर्मान काढत आहेत, याचे व्हिडिओ काढत आहेत आणि पाठवत आहेत," असा दावा राज ठाकरेंनी केला.
"मी फतवा काढतोय..."
मुल्ला मौलवी फतवा काढत असतील तर आज राज ठाकरे फतवा काढतोय. जिथे माझे उमेदवार असतील तिथे माझ्या पाठीशी उभे राहा. उद्या सत्ता हातात दिल्यानंतर पहिल्या 48 तासात मशिदीवरचे भोंगे काढले नाही तर परत तर राज ठाकरे नाव सांगणार नाही. जर अंगावर येण्याचा प्रयत्न केला तर खाकीवाल्यांना ऑर्डर देईन. ते रझा अकादमीचा बदला घेतील," असा इशारा राज ठाकरेंनी दिला.
हेही वाचा