विखे-पाटील परिवाराबद्दल शरद पवारांच्या मनात द्वेष का? असा सवाल विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी उपस्थित केला आहे. गुरुवारी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. तसंच बाळासाहेब विखे-पाटील यांच्याबद्दल पवारांनी केलेलं वक्तव्य हे दुर्देवी असून त्या वक्तव्यामुळं आपल्याला दु:ख झाल्याचं ते म्हणाले.
जे आज हयात नाहीत त्यांच्याबद्दल वक्तव्य करणं चुकीचं असल्याचं सांगत विखे-पाटील यांनी नाव न घेता शरद पवारांना टोला लगावला. तसंच त्यांच्या वक्तव्यामुळे आपल्याला दु:ख झालं असून त्यांच्या मनात द्वेष का असा सवालही त्यांनी यावेळी केला.
सुजय विखे-पाटील यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर राधाकृष्ण विखे-पाटील हे आपल्या विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा देतील अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. परंतु त्यांनी पत्रकारांशी बोलताना याविषयी भाष्य करण्याचं टाळलं. तसंच मुलासाठी संघर्ष उभा राहिलं असं म्हणणं चुकीचं असल्याचंही त्यांनी नमूद केलं. तसंच नगरमध्ये राष्ट्रवादीच्या प्रचाराला आपण जाणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
नगरमधील निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला तीन वेळा पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. त्यामुळं काँग्रेसला ही जागा मिळाली असती तर त्याचा फायदा झाला असता असं ते म्हणाले. तसंच या विषयावर अनेकदा चर्चा झाली. तसंच समन्वय घडवून आणण्याचा आम्ही पूर्ण प्रयत्न केला होता. स्वाभिमान, वंचित आघाडी यांच्यासाठी कोणत्या जागा सोडायच्या यावर चर्चा सुरू होती. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसही आपल्या भूमिकेवर ठाम होती. तोवर सुजय यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला होता, अशी माहिती त्यांनी दिली.
सुजय विखे यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर बाळासाहेब थोरात यांनी विखे-पाटील यांनी भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली होती. त्यावर प्रतिक्रिया देताना थोरात हे हायकमांड पेक्षा स्वत:ला मोठं समजतात का असा सवाल केला. तसंच ते आपले हायकमांड नसून त्यांच्याकडं स्पष्टीकरण देण्याची गरज नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. तसंच आपल्याला जे काही सांगायचं असेल तर पक्षाच्या नेत्याकडे वेळ आल्यावर सांगू असंही ते म्हणाले.
हेही वाचा -
काँग्रेसच्या दुसऱ्या यादीत महाराष्ट्रातील ५ उमेदवार जाहीर