देशभरातील लॉकडाऊन २ आठवड्यांनी म्हणजेच १७ मे पर्यंत वाढवण्याची घोषणा केंद्र सरकारनं शुक्रवार १ मे २०२० रोजी केली आहे. यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्रालयाने एक पत्रक जारी केलं आहे. सर्व राज्यांमधील कोरोनाग्रस्तांची समीक्षा केल्यानंतरच हा निर्णय घेण्यात आल्याचं सरकारकडून सांगण्यात आलं आहे. ३ मे रोजी लॉकडाऊनचा दुसरा टप्पा पूर्ण होण्याआधीच केंद्राने तिसऱ्या लाॅकडाऊनची घोषणा केली आहे. या लाॅकडाऊनदरम्यान रेड झोनमधील कोणत्याही भागांना सवलत देण्यात येणार नाही, असंही या पत्रकात नमूद करण्यात आलं आहे.
असे पडले टप्पे
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वात पहिल्यांदा २३ दिवसांचा लाॅकडाऊन घोषित केला होता. हा लाॅकडाऊन १४ एप्रिल रोजी संपण्याआधीच पंतप्रधानांनी हा लाॅकडाऊन ३ मे पर्यंत वाढवला. दरम्यानच्या काळात देशभरात कोरोनाबाधितांच्या संख्येनुसार जिल्हानिहाय रेड, आॅरेंज आणि ग्रीन झोन असे झोन पाडण्यात आले. यांतील रेड झोन वगळता ग्रीन आणि आॅरेंज झोनमध्ये अटी शर्थींचं पालन करून अंशत: लाॅकडाऊनमधून सवलतही देण्यात आली.
A limited number of activities will remain prohibited across India, irrespective of the zone, including travel by air, rail, metro & inter-State movement by road; running of schools, colleges, & other educational & training/coaching institutions: MHA pic.twitter.com/R6DYKTcs36
— ANI (@ANI) May 1, 2020
उद्योगांना दिलासा
ग्रीन झोनमध्ये जिल्हांतर्गंत उद्योगधंदे सुरू करण्यास सरकारने परवानगी दिल्यामुळे काही प्रमाणात व्यापारी, कारखानदारांना दिलासा मिळाला होता. पाठोपाठ केंद्र सरकारने ४ मे नंतर परप्रांतीयांना सोशल डिस्टन्सिंगचं पालन करत आपापल्या राज्यांत परत जाण्यास मुभा दिली. यामुळे ४ मे नंतर लाॅकडाऊन शिथील करण्यात येईल, असा अंदाज देशवासीयांकडून लावण्यात येत होता. मात्र गृह मंत्रालयाने परिपत्रक काढत तिसऱ्या टप्प्यातील लाॅकडाऊन १४ दिवसांनी वाढवल्याचं स्पष्ट केलं आहे. या काळात विमान आणि रेल्वे वाहतूक सुरू करण्यात येणार नसल्याचंही केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे.
नव्या गाईडलाइन्स
तिसऱ्या टप्प्यातील लाॅकडाऊनमध्ये ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये सशर्त सवलती देण्यात येतील. परंतु रेड झोनमध्ये (कटेंन्मेंट झोनमधील) कोणतीही सवलत देण्यात येणार नाही. रेड झोन, ऑरेंज झोन आणि ग्रीन झोन्ससाठी गृहमत्रालयानं काही नव्या गाईडलाइन्सही जारी केल्या आहेत. ग्रीन झोन्समध्ये मागील २१ दिवसांमध्ये कोरोनाचा एकही नवा रुग्ण सापडला नाही, अशा भागांचा समावेश करण्यात आला आहे. तसंच ज्या जिल्ह्यांचा समावेश रेड किंवा ग्रीन झोनमध्ये नसेल ते जिल्हे ऑरेंज झोनमध्ये सामिल करण्यात येणार आहे.