राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाच्या तपासावरून पार्थ पवार यांची बुधवारी कडक शब्दांत कानउघडणी केली. तेव्हापासून शरद पवार आणि अजित पवार यांच्यात पुन्हा काहीतरी बिनसलं असून महाराष्ट्रातलं महाविकास आघाडी सरकार धोक्यात असल्याच्या चर्चांनी डोकं वर काढलं. परंतु या चर्चांमध्ये कुठलंही तथ्य नसून हे सरकार ५ वर्षे टिकणार असल्याचा दावा शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केला. (maha vikas aghadi government will stable for next 5 years says shiv sena mp sanjay raut)
संजय राऊत यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना हा दावा केला. यावेळी राऊत म्हणाले, महाविकास आघाडी सरकारला कुठलाही धोका नाही. हे सरकार पूर्ण ५ वर्षे टिकणार आहे. पूल बिहारमध्ये पडलेत. आधीच्या सरकारने बांधलेले पूल पडले आहेत. विरोधकांनी आम्हाला कोणतेही सल्ले देऊ नयेत. उद्धव ठाकरे सरकारला १७० आमदारांचा पाठिंबा आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वाखाली हे सरकार ५ वर्षे चालणार यात आमच्या कोणाच्याही मनात काही शंका नाही, असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं.
हेही वाचा - ‘नया है वह’, राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याने केली पार्थची पाठराखण
काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांची मंत्रालयात भेट घेतली. या भेटीत त्यांनी सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाची सीबीआय चौकशीची मागणी करणारं निवेदन गृहमंत्र्यांना दिलं. आपल्याला देशभरातून तरुणांचे फोन येत आहेत. खासकरून यूपी, बिहारमधून अधिक फोन येत असून या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी त्यांच्याकडून केली जात आहे. या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी अशी तरुणांची भावना असल्याचं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं होतं. पार्थ यांच्या या भूमिकेमुळे राष्ट्रवादीची तर गोची झालीच परंतु भाजपच्या हाती आयतं कोलीतही मिळालं.
त्यासंदर्भात शरद पवार यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, पार्थचा अनुभव कमी आहे. तो प्रगल्भ नाही. त्यामुळे माझ्या नातवाच्या बोलण्याला मी कवडीचीही किंमत देत नाही. सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास करण्यास महाराष्ट्र तसंच मुंबई पोलीस सक्षम आहेत. त्यांच्यावर मला १०० टक्के विश्वास आहे. पण तरीही कुणाला सीबीआय किंवा इतर यंत्रणेने तपास करावा असं वाटत असेल तर मी त्याला विरोध करणार नाही. चौकशी कोणी करायची हा राज्य सरकार, सीबीआयचा प्रश्न आहे, असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं.
शरद पवार जरी पार्थला उद्देशून बोलले असले, तरी त्यांनी अप्रत्यक्षपणे अजित पवार यांना सुनावल्याचंही म्हटलं जाऊ लागलं होतं.
हेही वाचा - सुशांतच्या आत्महत्येच्या चर्चा आश्चर्यजनक, शरद पवारांनी पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया