महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत जनतेने भाजप-शिवसेनेच्या बाजूने कौल दिल्याने आम्ही कुठल्याही प्रकारे सत्तास्थापनेचा प्रयत्न करणार नाही. आम्ही विरोधी बाकांवरच बसून काम करून असा खुलासा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला.
बारामतीमध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रीया सुळे आणि नवनिर्वाचीत आमदार रोहित पवार सुद्धा उपस्थित होते. यावेळी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना पवार यांनी ही भूमिका स्पष्ट केली.
भाजप-शिवसेना महायुतीला विधानसभा निवडणुकीत १६१ जागा मिळाल्या आहेत. महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं असलं, तरी शिवसेनेने अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदावर दावा करत भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यामुळेच नवनिर्वाचीत आमदारांच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपने ठरल्यानुसार सत्तेत समान वाटा न दिल्यास इतर पर्याय खुले असल्याचा इशारा दिला आहे.
त्यामुळे भाजपने शिवसेनेला मुख्यमंत्रीपद देण्याचं आश्वासन न दिल्यास राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेला सत्तास्थापनेस मदत करेल का? यावर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत. यावर स्पष्टीकरण देताना राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी देखील राष्ट्रवादी विरोधी पक्ष म्हणूनच काम करेल, असं सांगितलं होतं.
हेही वाचा-
मुख्यमंत्रीपदाचं लेखी आश्वासन द्या, शिवसेना आमदार भाजपविरोधात आक्रमक
‘वंचित’ मुळे ‘हे’ २३ उमेदवार जिंकता जिंकता राहिले