महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी 'मुंबई मेट्रोच मराठी माणसाचा घात करणार' असल्याचा आरोप केला आहे. विधानसभा निवडणुकीसाठी गुरूवारी प्रभादेवी इथं झालेल्या प्रचारसभेत राज ठाकरे यांनी म्हटलं. त्याशिवाय आरेच्या वृक्षतोडीबाबतही त्यांनी यावेळी भाष्य केलं. आरेच्या बाबतीत हे सरकार रात्री खून करणारं रामन राघव सरकार असल्याचा आरोप राज ठाकरेंनी केला.
'आरेचं जंगल एका रात्रीत नष्ट केलं. हे सरकार तुमच्या इच्छा आकाक्षांवर वरवंटा फिरवतं आहे. पायाभूत सुविधांच्या नावाखाली मेट्रो आणली जाणार, मग जागांचे भाव आणखी वाढत जाणार. या जागा मराठी माणसाच्या आवाक्याबाहेर जाणार, गेलेल्या आहेतच. मेट्रो आल्यावर आणखी दर वाढणार, सरकत सरकत तुम्ही मुंबईच्या बाहेर पडणार. कल्याण डोंबिवलीला जाणार. तिथे जागा नाही म्हणून आणखी पुढे जाणार, अरे बाबांनो असं करु नका नाहीतर सरकत सरकत उझबेकिस्तानला जाल', असा टोला राज ठाकरे यांनी लगावला.
'मेट्रो मराठी माणसाचा घात करणार, मी हे वाक्य विरोधासाठी विरोध करायचा म्हणून उच्चारलेलं नाही. मी प्रगतीच्या आड येणारा माणूस नाही. मात्र ही मेट्रो मराठी माणसाचा घात करणार, अशा प्रकारचं दळणवळण वाढलं की जागांचे भाव आणखी वाढतात. शहरांमध्ये गर्दी होऊ नये गर्दी बाहेर जायला पाहिजे यासाठी प्रयत्न व्हायला हवेत ते कुठंही होताना दिसत नाही', असंही राज ठाकरेंनी म्हटलं.
'आरेच्याबाबतीत कोर्टानं शुक्रवारी निर्णय दिला. एका रात्रीत २७०० झाडं तोडण्यात आली. आपण त्याबाबतही काहीही बोलत नाही. तुम्ही मुंबईतल्या जागांचे मालक आहात आणि सरकारच्या स्वार्थी कारभारापुढे तुम्ही गप्प बसणार. या सरकारचा कारभार नादान आहे. दादर, प्रभादेवी, परळ, लालबाग या ठिकाणी आता भाषा बदलू लागली आहे. मराठी भाषा कमी होते आहे हिंदी भाषिक जास्त दिसत आहेत. शिवाजी पार्क मैदानाची देखील भाषा बदलू लागली आहे संध्याकाळी गेल्यावर तुम्हाला कानावर कोणती भाषा येते ते ऐका. जे तुमच्या हक्काचं आहे तेही तुम्हाला टिकवता येत नाही' असंही राज ठाकरे यांनी या सभेत म्हटलं.
हेही वाचा -
नरेंद्र मोदी- उद्धव ठाकरे यांची मुंबईत संयुक्त प्रचारसभा
ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन रूग्णालयात दाखल