अयोध्येतील राम मंदिर भूमिपूजन सोहळ्याच्या आमंत्रणावरून चर्चा सुरू असतानाच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील अयोध्येला जाणार असल्याचा खुलासा शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी केला आहे. तर दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे यांना भूमिपूजन कार्यक्रमाचं आमंत्रण मिळालं, तरी त्यांनी या कार्यक्रमाला जाऊ नये अशी भूमिका महाविकास आघाडीतील सहकारी पक्षाकडून घेतली जात आहे.
येत्या ५ आॅगस्ट रोजी अयोध्येतील राम मंदिर उभारणीच्या कामाला भूमिपूजन सोहळ्यापासून सुरूवात होणार आहे. त्यासाठी श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट तर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रण देण्यात आलं आहे. पंतप्रधान कार्यालयाकडून देखील हिरवा झेंडा दाखवण्यात आला आहे.
हेही वाचा- "राम मंदिर होईल, तेव्हाच कोरोना जाईल.."!
या पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांनी संजय राऊत यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी राऊत म्हणाले की, पंतप्रधान अयोध्येला जाणार आहेत. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील अयोध्येला नक्की जातील. कारण राम मंदिर हा विषय शिवसेनेसाठी राजकीय नाही, तर श्रद्धेचा विषय आहे. राम मंदिरासोबतचं शिवसेनेचं नातं हे भावनिक आणि धार्मिक आहे. राम मंदिराच्या मार्गातील अडथळे दूर करण्यासाठी शिवसैनिकांनी मोठं बलिदान दिलं आहे. शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे या आंदोलनाचे शिल्पकार होते. राम मंदिराच्या कार्याला गती मिळावी म्हणून बाळासाहेबांनंतर उद्धव ठाकरे देखील प्रयत्नशील होते. ते मुख्यमंत्री असताना आणि नसतानाही अयोध्येला गेले होते, असंही संजय राऊत यांनी स्पष्ट केलं.
ज्या श्रद्धेने मुख्यमंत्री पंढरपूरला शासकीय पूजेसाठी गेले होते, निमंत्रण आल्यास त्याच श्रद्धेने मुख्यमंत्री राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्यालाही जातील. किमान समान कार्यक्रमावर सरकार चालवणं हा महाविकास आघाडीचा अजेंडा आहे. अयोध्येला जाणं न जाणं हा काही महाविकास आघाडीचा अजेंडा नाही. त्यामुळे मुख्यमंत्री ठाकरे अयोध्येला जाण्याबाबत मतभेद असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असंही संजय राऊत यांनी स्पष्ट केलं.
धर्मनिरपेक्ष सरकारचे प्रतिनिधी म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राम मंदिर भूमिपूजन सोहळ्याला उपस्थित राहू नये, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार माजिद मेनन यांनी मांडली होती. त्यावर बोलताना राज्यात तीन पक्षाचं सरकार आहे. एखाद्या विषयावर एकमत झालंच पाहिजे असं महाविकास आघाडीच्या घटनेत लिहिलेलं नाही. त्यामुळे प्रत्येकजण आपआपल्या पक्षाची भूमिका घेऊन पुढे जातो, असं मत राऊत यांनी व्यक्त केलं.
हेही वाचा- Ram Mandir: अयोध्येचा रस्ताच शिवसेनेने तयार केलाय- संजय राऊत