दिवाळीच्या पहिल्या दिवशी म्हणजेबुधवारी राज्य सरकारने मोठा गाजावाजा करत शेतकरी कर्जमाफीचा कार्यक्रम सह्याद्री अतिथीगृहात पार पाडला. यावेळी मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्या हस्ते काही शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचं प्रमाणपत्र देण्यात आली. मात्र दिवाळी संपली तरी शेतकऱ्यांच्या खात्यात अद्याप पैसेच जमा झाले नसल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळाली आहे. विशेष म्हणजे सरकारने एक- दोन नव्हे, तर तब्बल ९२५ शेतकऱ्यांना ही प्रमाणपत्र दिली आहेत.
'छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना' जाहीर केल्यानंतर दिवाळीपूर्वीच कर्जमाफीच्या योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी केल्यामुळे शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाल्याची वलग्ना करणाऱ्या सरकारचा मात्र यामुळे बुरखा फाटला आहे. याबाबत 'मुंबई लाइव्ह'ने संबधित विभागाशी संपर्क केला असता त्यांनी देखील शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा झाली नसून, ती दोन दिवसात जमा होणे अपेक्षित असल्याचं सांगितलं.
जाहीर केलेली कर्जमाफी आजपासून कार्यन्वित झाली आहे. आमच्या सर्वाकरता हा कर्तव्य पूर्तीचा दिवस आहे. कर्जमाफी हा अंतिम उपाय नाही.
मिळालेल्या माहितीनुसार सरकारी तिजोरीतून कर्जमाफीच्या खात्यामध्ये ३,८०० कोटी रुपये पहिल्या टप्प्यामध्ये जमा झाल्याचं सांगण्यात येत आहे. यामध्ये दीड लाखांपर्यंत कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांचा आणि नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांचा समावेश आहे. ही रक्कम त्यानंतर ३३ व्यापारी आणि ३० जिल्हा मध्यवर्ती बँकेत गेल्यावर मिळणार होती. मात्र दिवाळी संपूनही शेतकरी कर्जमुक्त झालेला नाही.
पात्र आणि अपात्र शेतकऱ्यांची आकडेवारी अद्याप कळालेली नसली, तरी त्यासाठी खास सॉफ्टवेअर तयार करण्यात आलं आहे. त्यानुसार ग्रीन, रेड, आणि येल्लो अशी कॅटेगरी बनवण्यात आली आहे. याचसोबत सेवार्थ सॉफ्टवेअरला कर्जमाफीच्या कनेक्शनला जोडण्यात आलं असून, त्यामुळे शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांची माहिती मिळणार आहे. 'रेड' म्हणजे अपात्र, 'ग्रीन' पात्र आणि 'येल्लो' म्हणजे पात्रतेबद्दल सविस्तर चौकशी करणाऱ्यांचा समावेश असेल. हे सगळं काही त्रुटी राहू नयेत यासाठी करण्यात आल्याचं समजतं.
याबाबत सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी सलग सुट्ट्या आल्यामुळे विलंब झाल्याचं सांगितलं.
कर्जमाफीची ही योजना फसवी आहे. ५ दिवस झाले तरी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे येत नाहीत हे सरकारचं अपयश आहे.
- धंनजय मुंडे, विरोधीपक्ष नेते, विधान परिषद
हेही वाचा -