गृह प्रकल्पामध्ये घरं देण्याच्या नावाखाली ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या विकासकांवर कडक कारवाई करण्यासाठी व ग्राहकांना न्याय देण्याच्या दृष्टीने एम.पी.आय.डी. कायद्यात सुधारणा करण्यात येईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधानपरिषदेत सांगितलं.
मुंबईतील एन. डी. डेवकॉन प्रा. लि. या बांधकाम व्यावसायिक कंपनीच्या संचालकांनी ग्राहकांची फसवणूक केली. यासंबंधीचा प्रश्न सदस्य किरण पावसकर यांनी उपस्थित केला होता.
या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, या संदर्भात संबंधित आरोपीला अटक केली आहे. त्यांची १८ बँक खाती गोठवण्यात आली आहेत. दोन आरोपी परदेशात गेले आहेत. त्यांना परत आणण्याचा प्रयत्न करण्यात येत असून ग्राहकांना न्याय मिळवून देण्यासाठी एम.पी.आय.डी. कायद्यात सुधारणा करण्यात येणार आहे.
गृह प्रकल्पात फसवलेल्या ग्राहकांना भाडेतत्वावर जागा देण्याबाबत किंवा रखडललेले गृह प्रकल्प म्हाडाकडे हस्तांतरित करण्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल, असंही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दरेकर यांनी विचारलेल्या उप प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं.