औरंगाबाद इथं जलसमाधी आंदोलनादरम्यान गोदावरी नदीच्या पात्रात बुडून मृत्यू झालेल्या तरूणाच्या मृत्यूच्या निषेधार्थ मराठा क्रांती मोर्चा समन्वय समितीने उद्या मंगळवारी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. एवढंच नव्हे, तर मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर न्याय मिळवून देण्यास अपयशी ठरल्याचा ठपका ठेवत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणीही मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांनी केली आहे.
औरंगाबादमध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी जलसमाधी आंदोलन केलं. कायगाव टोका इथल्या गोदावरी नदीच्या काठावर हे आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनादरम्यान काकासाहेब शिंदे नावाच्या तरूणाने नदीपात्रात उडी घेतल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला. त्यामुळे मराठा मोर्चातील आंदोलनकर्ते आणखी संतप्त झाले असून त्यांनी या तरूणाच्या मृत्यूच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे.
महाराष्ट्र बंद अत्यंत शांततेत पाळण्यात येईल. सार्वजनिक परिवहन सेवा, अॅम्ब्युलन्स तसंच अन्य अत्यावश्यक सेवा या बंदमधून वगळण्यात येतील, असं समन्वय समितीने स्पष्ट केलं आहे. पंढरपुरात आषाढीसाठी आलेल्या वारकऱ्यांचा परतीचा प्रवास सुखरुप व्हावा, यासाठी त्यांची वाहने, एसटी बसगाड्यांना लक्ष्य करण्यात येऊ नये, असंही संघटनेने आंदोलकांना आवाहन केलं आहे.
राज्य शासनाने पुढच्या २ दिवसांत मराठा समाजाच्या मागण्यांवर निर्णय घेतला नाही तर राज्यभरात उद्रेक होईल. त्यातून जी परिस्थिती निर्माण होईल त्याला पूर्णपणे सरकार जबाबदार असेल, असंही आंदोलनकर्त्यांनी सांगितलं आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागीसाठी मराठा समाजाने मागील काही वर्षांपासून राज्यभरात ठिकठिकाणी भव्यदिव्य पण शांतीपूर्ण मार्गाने अनेक मूक मोर्चे काढले. तरी देखील राज्य सरकारने या आंदोलनाची योग्य दखल न घेतल्याने मराठा समाजाला न्याय न मिळाल्याची खदखद आंदोलनकर्त्यांमध्ये वाढीस लागली आहे. परिणामी मराठा समाज आक्रमक होत असून परभणीत आंदोलकांनी वाहनांची जाळपोळ केली.
हेही वाचा-
मराठा मोर्चाच्या इशाऱ्यानंतर मुख्यमंत्र्यांची 'पंढरपूर वारी' रद्द!
मराठा आरक्षणावर आणखी किती वेळ द्यायचा? उच्च न्यायालयाचा संतप्त सवाल