Advertisement

मनसेचा ठाण्यात राडा... बुलेट ट्रेनचा सर्व्हे रोखला

आक्रमक मनसे कार्यकर्त्यांनी सर्व्हे करणाऱ्या अधिकाऱ्यांना हुसकावून लावलं. एवढंच नाही, तर यापुढे ठाणे-पालघर जिथं कुठं या प्रकल्पाचा सर्व्हे होईल तिथं मनसे कार्यकर्ते पोहोचून सर्व्हे उधळून लावतील, अशी प्रतिक्रिया मनसेचे ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी 'मुंबई लाइव्ह'शी बोलताना दिली.

मनसेचा ठाण्यात राडा... बुलेट ट्रेनचा सर्व्हे रोखला
SHARES

ठाण्यातील दिवा-शीळ इथं सुरू असलेलं अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचं सर्वेक्षण सोमवारी मनसे कार्यकर्त्यांनी उधळून लावलं. बुलेट ट्रेनची गरज नसून हा प्रकल्प होऊ देणार नाही, असं म्हणत आक्रमक मनसे कार्यकर्त्यांनी सर्व्हे करणाऱ्या अधिकाऱ्यांना हुसकावून लावलं. एवढंच नाही, तर यापुढे ठाणे-पालघर जिथं कुठं या प्रकल्पाचा सर्व्हे होईल तिथं मनसे कार्यकर्ते पोहोचून सर्व्हे उधळून लावतील, अशी प्रतिक्रिया मनसेचे ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी 'मुंबई लाइव्ह'शी बोलताना दिली.


जोरदार विरोध

तब्बल १ लाख १० हजार कोटी रुपये खर्चाच्या बुलेट ट्रेनला शेतकऱ्यांचा विरोध आहे. या प्रकल्पात शेतकऱ्यांच्या शेतजमिनी जाणार असल्यानं शेतकऱ्यांनी या प्रकल्पाला जोरदार विरोध केला आहे. तर दुसरीकडे बुलेट ट्रेनची गरजच काय, हा तर मुंबईला राज्यापासून तोडण्याचा डाव असल्याचं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुलेट ट्रेनविरोधात उघड भूमिका घेतली आहे.


भावनिक आवाहन

नुकतीच राज ठाकरे यांची पालघरमध्ये सभा झाली. या सभेत राज ठाकरे यांनी बुलेट ट्रेनसाठी जमिनी देऊ नका आणि चिमाजी आप्पांसारखं शौर्य दाखवत जबरदस्तीनं टाकलेले रूळ उखडून टाका, असं आवाहन केलं होतं. या आवाहनाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी मनसे कार्यकर्त्यांनी दिवा-शीळ येथील सर्व्हे उधळून लावला.


नेमकं काय झालं?

सोमवारी सकाळी दिवा-शीळ इथं ठाणे तहसील कार्यालयाकडून बुलेट ट्रेनच्या सर्व्हेला सुरूवात झाल्याची माहिती मिळताच जाधव यांच्यासह मनसे कार्यकर्त्यांनी तिथं धाव घेतली. अधिकाऱ्यांना सर्व्हे करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. अधिकाऱ्यांनी सर्व्हे रोखण्यास नकार दिला असता मनसे कार्यकर्त्यांनी राडा करत, सर्व्हेचं सामान उचलून नेलं आणि अखेर अधिकाऱ्यांनी हा सर्व्हे बंद केला.


शेतकऱ्यांचा आणि जनतेचा विरोध डावलून हा प्रकल्प राबवला जात आहे. खरं तर या प्रकल्पाची गरजच नाही. तरीही हा प्रकल्प रेटला जात आहे. त्यामुळे हा प्रकल्प आम्ही कुठल्याही परिस्थितीत होऊ देणार नाही. मनसे कार्यकर्ते सर्व्हे तर रोखतीलच; पण जिथं काम सुरू करण्याचा प्रयत्न यंत्रणांकडून होईल तिथं कामही होऊ दिले जाणार नाही.
- अविनाश जाधव, मनसे जिल्हाध्यक्ष, ठाणे-पालघर

सर्व्हे रोखल्यानं आणि पुढेही मनसेचा असाच विरोध सुरू राहिल्यास त्याचा मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कामावर परिणाम होणार असल्याचं म्हटलं जातं आहे.



हेही वाचा-

गुजरातचा मुंबई हडपण्याचा डाव- राज ठाकरे

नाणारची जमीन परप्रांतीयांच्या ताब्यात कशी? राज ठाकरे



Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा