Advertisement

मनसेचं इंजिन चार्ज, राज ठाकरेंनी केले २ उमेदवार जाहीर


मनसेचं इंजिन चार्ज, राज ठाकरेंनी केले २ उमेदवार जाहीर
SHARES

आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपले उमेदवार उतरवणार की नाही हा प्रश्न आता इतिहासजमा झाला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी वांद्र्यातील एमआयजी क्लब इथं २ उमेदवारांच्या नावांची घोषणाही करून टाकली. तसंच राज ठाकरे ५ आॅक्टोबरला पहिली प्रचारसभा घेणार असल्याने मनसे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे.   

मनसेत प्रवेश

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना विधानसभा निवडणुकीत उमेदवार उभे करणार असल्याची घोषणा यावेळी केली. त्यानंतर मंत्रालयात आत्महत्या केलेले धर्मा पाटील यांचे चिरंजीव नरेंद्र पाटील आणि नाशिकमधील शिवसेना नगरसेवक दिलीप दातार यांनी राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसेत प्रवेश केला. हे दोघेही मनसेकडून निवडणूक लढवतील, असं यावेळी राज ठाकरे यांनी जाहीर केलं.

'हे' आहेत उमेदवार

नरेंद्र पाटील हे धुळे जिल्ह्यातील विखरण गावचे शेतकरी धर्मा पाटील यांचे चिरंजीव आहेत. धर्मा पाटील यांनी गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात मंत्रालयात विष प्राशन करून आत्महत्या केली होती. धुळे जिल्ह्यात होऊ घातलेल्या औष्णिक वीज प्रकल्पात पाटील यांची ५ एकर जमीन संपादित करण्यात आली होती. परंतु जमिनीचा योग्य मोबदला न मिळाल्याने ते मंत्रालयाच्या पायऱ्या झिजवत होते. नरेंद्र पाटील यांना धुळे जिल्ह्यातून तिकीट मिळेल, अशी शक्यता आहे.

तर, दिलीप दातार नाशिक महापालिकेत शिवसेनेचे उमेदवार होते. शिवसेनेतून तिकीट मिळण्याची शक्यता नसल्याने दातार यांनी मनसेत प्रवेश केल्याचं म्हटलं जात आहे.   दातार यांना नाशिक पश्चिम मतदारसंघातून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.  
Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा