पेट्रोल, डिझेल आणि गॅस दरवाढीविरोधात काँग्रेससह देशातील विरोधी पक्षांनी सोमवारी १० सप्टेंबरला 'भारत बंद'ची हाक दिली आहे. या 'भारत बंद'ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. त्यामुळे गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्यांनी सोमवारी संध्याकाळी ५-६ वाजल्यानंतरच घराबाहेर पडण्याचं आवाहन मनसेतर्फे करण्यात आलं आहे.
१० सप्टेंबर २०१८ रोजी पेट्रोल आणि डिझेल दरवाढीविरोधातील 'भारत बंद' ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पाठिंबा आणि सक्रिय सहभाग. pic.twitter.com/Ir9ZPnhIdD
— Raj Thackeray (@RajThackeray) September 9, 2018
सध्या पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. या विरोधात उद्याच्या भारत बंदला संपूर्ण पाठिंबा देत आहे. तसंच या बंदमध्ये सक्रिय सहभाग घेणार आहोत. असं राज ठाकरे यांनी ट्विटवरद्वारे स्पष्ट केलं आहे. इंधनाचे दर आंतरराष्ट्रीय बाजाराशी संलग्न असले तरी केंद्र आणि राज्य सरकारने त्यावर अव्वाच्या सव्वा कर लावले आहे. नोटबंदीसारख्या चुकीच्या आर्थिक निर्णयामुळं सध्या अर्थव्यवस्था संकटात अाली आहेत. त्यातच केंद्र सरकारानं इंधन दरवाढ केल्यानं त्याची झळ सर्वसामान्य माणासांना बसत आहे. आणि या सर्व गोष्टींचा निषेध व्यक्त करण्यासाठी विरोधी पक्षांनी पुकारलेल्या बंदमध्ये सहभागी होणार असल्याचं राज यांनी स्पष्ट केलं आहे.
उद्याच्या बंदमध्ये मनसेचे कार्यकर्ते संपूर्ण ताकदीनं रस्त्यावर उतरणार आहे. परंतु बंद दरम्यान सार्वजनिक मालमत्तांची नासधूस होणार नाही आणि सर्वसामान्यांना त्याची झळ बसणार नाही याची काळजी घेण्याचं आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना केलं आहे. मनसेसह या भारत बंदमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पार्टी, आणि डावे पक्षही बंदमध्ये सहभागी होणार आहेत. त्यामुळं मुंबई बंदला चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
भारत बंदमध्ये शिवसेना सहभागी होणार नाही, असं खासदार संजय राऊत यांनी म्हटलं अाहे. विरोधी पक्षाला उशिरा जाग आली आहे. इंधन दरवाढ, वाढती महागाईच्या मुद्द्यावर विरोधी पक्ष अपयशी ठरले तर शिवसेना रस्त्यावर उतरेल, असंही राऊत यांनी सांगितलं अाहे. तर भारत बंदमध्ये सर्वसामान्य जनतेनं मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं व भारत बंद यशस्वी करावं असं आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केलं आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरेे यांनी भारत बंदला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला असून मनसे कार्यकर्त्यांचा बंदमध्ये सक्रिय सहभाग असणार आहे. मुंबईसह, ठाणे, कल्याण यासह संपूर्ण महाराष्ट्रात रविवारी संध्याकाळपासूनच मनसेचे कार्यकर्ते उद्याच्या बंदसाठी लोकांना विनंती करण्यासाठी रस्त्यावर उतरणार आहेत. सर्व कर्मचाऱ्यांनी, नोकरी करणाऱ्या लोकांनी उद्या एक दिवस कुठेही घराबाहेर पडू नये शिवाय गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांनी उद्या संध्याकाळी ५ किंवा ६ च्या नंतरच घराबाहेर पडावं.
- बाळा नांदगावकर, नेते, मनसे
इंधन दरवाढीविरोधात स्कूल बसच्या फीमध्ये प्रति महिना ७५ रुपये दरवाढ करण्यात आली असल्यानं कोणतीही स्कूल बस यात सहभागी होणार नसल्याचं स्कूल बस ओनर्स असोशिएननं स्पष्ट केलं आहे. त्यामुळं उद्या राजकीय पक्षांनी पुकारलेल्या संपात स्कूल बस सूरू राहणार असून आपल्या मुलाला शाळेत पाठवायच की नाही हे त्यांनी ठरवायचं आहे.
- अनिल गर्ग, अध्यक्ष, स्कूल बस ओनर्स असोशिएन
हेही वाचा-
'भारत बंद' १०० टक्के यशस्वी करणार- निरूपम
'यही है अच्छे दिन'! सेनेचा भाजपवर बाण