विधानसभा निवडणूक असो वा राज्यात झालेल्या महापालिका निवडणुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेेच्या इंजिनाची गती या निवडणुकांमध्ये कमी झाल्याचे पहायला मिळाली. राज ठाकरे यांचा करिष्माही मनसेला तारू शकला नाही. मतदारांनी पक्षाकडे पाठ फिरवल्यामुळे मनसेचे इंजिन थेट यार्डात जातेय की काय? अशी शक्यताही वर्तवण्यात आली.
पण, झाले तेवढे पुरे झाले, असे म्हणत केवळ इंजिनाची दिशा बदलण्याऐवजी इंजिनाला गती देण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही धाडसी निर्णय घेतले आहेत. 2019 च्या निवडणुकांसाठी राज ठाकरे यांनी पक्षाच्या कार्यकारिणीत जुन्या सहकाऱ्यांना वगळून नव्या दमाच्या शिलेदारांची निवड केली आहे.
शिवसेनेला रामराम करून मनेसमध्ये आलेल्या जुन्या सहकाऱ्यांना पक्षाच्या नव्या कार्यकारिणीतून वगळ्यात आले आहे. त्यात बाळा नांदगावकर, शिशिर शिंदे, नितीन सरदेसाई आणि संदीप दळवी या चौघांचा समावेश आहे. हे चौघेही राज ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जातात. मात्र पक्षाला उभारी देण्यात हे चौघेही कमी पडल्याने राज ठाकरे यांनी हा कठोर निर्णय घेतला.
जुन्या सहकाऱ्यांच्या जागी कार्यकारिणीत संदीप देशपांडे, यशवंत किल्लेदार, संजय नाईक आणि नंदू चिल्ले या चौघांची नेमणूक करण्यात आली आहे. मनसेचे सरचिटणीस आणि प्रवक्ते म्हणून संदीप देशपांडे यांना नेमण्यात आले आहे.
तर, दादरची जबाबदारी यशवंत किल्लेदार यांना देण्यात आली आहे. मनसेचे माजी आमदार नितीन सरदेसाई यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. भायखळ्यात विजय लिपारेंची जागा संजय नाईक यांनी घेतली आहे, त्यामुळे बाळा नांदगावकर यांचे महत्त्व कमी झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
शिवडीमध्ये सचिन देसाई यांची जागा नंदू चिले यांनी घेतली आहे. तर अंधेरी पूर्वेची जबाबदारी रवी इंदुलकरांकडून रोहन सावंत यांना देण्यात आली आहे.
"मिळालेल्या संधीकडे आम्ही आव्हान म्हणून पाहतोय. ही जबाबदारी आम्ही यशस्वीरित्या पार पाडू."
संदीप देशपांडे, मनसे सरचिटणीस आणि प्रवक्ते
हे देखील वाचा -
उत्सवाचं बाजारीकरण थांबवा - राज ठाकरे
डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट
मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा
(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)