इंधनवाढीवरून काँग्रेसने पुकारलेला बंद सोमवारी खऱ्या अर्थाने गाजवला तो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं. मनसेमुळं बंदचं वातावरण मुंबईसह राज्यात पाहायला मिळालं, बंद बऱ्यापैकी यशस्वी झाला. असं असताना शिवसेनेकडून मात्र बंद अयशस्वी झाल्याचं सांगितलं गेल्यानं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेनेची चांगलीच खरडपट्टी काढली. शिवसेनेला स्वत: ची भूमिका नाही, काय करायचं नि काय करायचं नाही हेच त्यांना कळत नसल्याचं म्हणत राज यांनी शिवसेनेची तुलना केसाळ कुत्र्याशी केली. 'भारत बंद' पार पडल्यानंतर कृष्णकुंज इथं घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांनी बंद यशस्वी झाल्याचं सांगतानाच शिवसेनेवर जोरदार टीकास्त्र सोडलं.
काँग्रेसनं बंद पुकारला असतानाही मनसे या बंदात सहभागी का झाली? मनसे इतकी आक्रमक का दिसून आली? असा सवाल करण्यात आला. असा सवाल करणाऱ्यांना मला हेच सांगायचंय की बंद कुणी पुकारलाय हे महत्त्वाचं नाही, तर कुठल्या मुद्द्यावरून बंद पुकारण्यात आला आहे, हे महत्त्वाचं आहे. सध्याच्या स्थितीत इंधन दरवाढीचा मुद्दा अत्यंत गंभीर आहे. इंधनदरवाढीनं सर्वसामान्य जनता हैराण झाली आहे. त्यामुळंच या आम्ही बंदमध्ये सहभागी झालो. सोमवारचा बंद यशस्वी करणाऱ्या माझ्या सर्व मनसैनिकांचे मी अभिनंदन करतो, असं म्हणत राज ठाकरे यांनी बंद यशस्वी झाल्याचा पुनरूच्चार केला.
केंद्रीय मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी इंधन दरवाढ कमी करणं आमच्या हातात नाही, असं म्हणत हात झटकले. यावरून सर्वच स्तरातून रवी शंकर प्रसाद आणि भाजपावर टीका होत आहे. त्यावरून राज यांनी रवी शंकर प्रसाद आणि भाजपाला कोंडीत पकडण्याची संधी सोडली नाही.
काँग्रेसच्या काळात इंधन दरवाढ झाली म्हणून ओरडणारे भाजपाच होती. तेव्हा त्यांना कळलं नाही का की इंधन दरवाढ कमी करणं आपल्या हातात नसतं ते? असा सवाल करत दरवाढ कमी करता येत नाही ही भाजपाची निव्वळ थाप असल्याचंही राज ठाकरे यावेळी म्हणाले. आपण काय बोलतोय नि काय नाही याची जराही लाज या नेत्यांना वाटत नाही, असं म्हणत रवी शंकर प्रसाद यांच्यावरही राज ठाकरे यांनी यावेळी निशाण साधला.
बंदच्या काळात असो वा खड्डे, फेरीवाले, मराठी पाट्या वा मल्टिप्लेक्सचा विषय असा विविध विषयांवर मनसेनं आक्रमक भूमिका घेत खळखट्याक केलं आहे. या खळखट्याक आंदोलनात सहभागी झालेल्या मनसैनिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मनसैनिकांवर कशाही प्रकारे गंभीर गुन्हे नोंदवले जात असल्याबद्दल राज ठाकरे यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली. मनसैनिकांवर काय गुन्हे लावयाचेत ते लावा. पण हे देखील लक्षात ठेवा की, तुम्ही जेव्हा सत्तेतून पायउतार व्हाल तेव्हा तुमच्याही वाटेला अशा गोष्टी येऊ शकतात.
काँग्रेसच्या काळात तुम्ही बंद केला, तुम्हीही आंदोलन केली, पण तेव्हा काँग्रेसनं अशी कलमं लावली नाहीत, असं म्हणत त्यांनी एकीकडे काँग्रेसला गोंजरलं असून दुसरीकडे भाजपाला ठोकलं आहे. तर नगरसेवक संजय तुर्डे यांनी अजूनही जामिन मिळत नसल्याचं सांगत राज ठाकरे यांनी थेट न्याय व्यवस्थेकडेही बोट दाखवलं. तुर्डे फुटला नाही, त्यांच्याकडे गेला नाही म्हणून हा असा सूड उगवला जातोय, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.
हेही वाचा-
देशात कुठेही हिंसाचार नाही, बंद १०० टक्के यशस्वी- अशोक चव्हाण
इंधनदरवाढीच्या भडक्यावर भाजपाचे हात वर, सर्वसामान्यांना दिलासा नाही?