राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रिम प्रोजेक्ट असलेल्या बुलेट ट्रेन प्रकल्पाचा फेरआढावा घेण्याचं ठरवलं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी बुलेट ट्रेनला सातत्याने कडाडून विरोध केला आहे. विधानसभेतील मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी देखील यासंदर्भात ट्विट करत आता ‘यू टर्न’ नको म्हणत मुख्यमंत्र्यांना बुलेट ट्रेन प्रकल्प गुंडाळण्याची मागणी केली आहे.
हेही वाचा- मोदींच्या ड्रिम प्रोजेक्टला ब्रेक? बुलेट ट्रेनचा फेरआढावा घेणार
लांबचं अंतर कमी वेळेत गाठण्यासाठी जगभरात बुलेट ट्रेनचा वापर होतो. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबाद-मुंबई दरम्यान अत्यंत कमी अंतराच्या मार्गादरम्यान बुलेट ट्रेन सुरू करून मुंबईवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करू पाहात आहेत, अशी भूमिका मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी वेळोवेळी आपल्या भाषणांतून मांडली आहे. सध्या या दोन्ही शहरांदरम्यान धावणाऱ्या रेल्वे गाड्या रिकाम्या धावत असताना बुलेट ट्रेनची गरजच काय? असा प्रश्न राज यांनी उपस्थित केला होता. हा प्रकल्प म्हणजे संयुक्त महाराष्ट्राची जखम पुन्हा जिवंत करण्यासारखा प्रकार असल्याचंही ते म्हणाले होते.
आता ‘U’ ‘T’urn नको !
— Raju Patil (@rajupatilmanase) December 2, 2019
बुलेट ट्रेन साठी महाराष्ट्र सरकारला द्यावे लागणारा हिस्सा व त्यासाठी BKC व इतर ठिकाणी भू संपादीत करायला लागणाऱ्या हजारो कोटी राज्याच्या इतर लोकोपयोगी कामांसाठी वापरावे.बुलेट ट्रेन प्रकल्प बासनात गुंडालायची #हीच_वेळ_आहे.@CMOMaharashtra @OfficeofUT
यावर आपलं मत मांडताना बुलेट ट्रेन प्रकल्प बासनात गुंडाळून या प्रकल्पासाठी लागणारे पैसे लोकोपयोगी कामासाठी खर्च करण्याची विनंतर आमदार राजू पाटील यांनी केली आहे. बुलेट ट्रेनला पालघरमधील रहिवाशांचा सक्त विरोध असून गुतरातमधील शेतकऱ्यांनीही या प्रकल्पासाठीच्या भूसंपादनावरून अनेकदा आंदोलने केली आहेत.