खड्ड्यांच्या मुद्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेना अत्यंत आक्रमक झाली असून मनसेकडून चक्क अधिकाऱ्यांना झोडपण्याची भाषा होत आहे. येत्या २ दिवसांत मुंबईसह मुंबई महानगर प्रदेशातील खड्डे न बुजवल्यास तुर्भेत जसं खळ्ळखट्याक् झालं, तसं मुंबईसह आसपासच्या परिसरातही होईल, असा इशारा मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी संबंधित यंत्रणांना 'मुंबई लाइव्ह'शी बोलताना दिला. एवढ्यावरच न थांबता देशपांडे यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग वा इतर संबंधित यंत्रणांच्या कार्यालयांना कितीही संरक्षण दिलं तरी येता-जाता अधिकाऱ्यांना झोडपून काढू, असं वादग्रस्त वक्तव्य करत खळबळ उडवून दिली आहे.
सोबतच, मनसैनिकांनी केलेलं आंदोलन योग्य असून सरकारला खड्डे दिसत नसतील तर आंदोलन दिसेल, असं ट्विट करत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसैनिकांच्या दंडात हवा भरण्याचं काम केलं अाहे.
"माझ्या मनसैनिकांनी केलेलं आंदोलन योग्यच आहे. जर सरकारला खड्डे दिसत नसतील, तर आंदोलन दिसेल!" - मनसे अध्यक्ष मा.राजसाहेब ठाकरे यांची प्रतिक्रिया.#RajThackeray #MNS #NaviMumbai #SionPanvelHighway #PotHoles https://t.co/J5vHnlZfve
— MNS Tweets (@manaseit) July 16, 2018
खड्ड्यामुळे आठवड्याभरात कल्याणमध्ये ५ तर नवी मुंबईत १ असे एकूण ६ बळी गेले आहेत. खड्ड्यामुळं होणाऱ्या अपघातांचं सत्र सुरूच असून खड्ड्यांचा मोठा त्रास रहिवाशांना होत आहे. रस्त्यांवर खड्डेच खड्डे असताना स्थानिक प्रशासन मात्र त्याकडे डोळेझाक करत आहे. त्यामुळंच मनसैनिक रस्त्यावर उतरून कायदा हातात घेत असल्याचा खुलासा देशपाडे यांनी केला.
सायन-पनवेल मार्गावर नुकताच एक बळी गेला आहे. यावरून सोमवारी मनसैनिकांनी तुर्भे येथील सार्वजनिक बांधकाम विभागचं कार्यालय फोडलं असून या प्रकरणी ५ जणांना अटक झाली आहे. या प्रकारानंतर मनसे थोडी शांत होईल असं वाटत असतानाच मनसेनं आपलं आंदोलन आणखी आक्रमक केलं आहे. २ दिवसांत खड्डे बुजवा नाही तर मार खायला तयार व्हा असाच इशारा मनसेकडून दिला जात आहे.
सायन-पनवेल मार्गाच्या प्रकल्प अधिकाऱ्यांना भेटत २ दिवसांत खड्डे बुजवण्याचं अल्टीमेटम देणार असल्याचं देशपांडे यांनी सांगितलं आहे. तर २ दिवसांत खड्डे बुजले नाही, तर तुर्भेसारखा प्रकार घडणार. पोलिस संरक्षणामध्ये अधिकारी कार्यालयात बसतील, पण घरी येण्या-जाण्यासाठी निघतील तेव्हा त्यांना मारू, अशी धमकीच देशपांडे यांनी दिली. त्यामुळं खड्ड्यावरून सुरू झालेलं मनसे स्टाईल आंदोलन आणि खड्ड्याचा वाद चिघळणार यात काही शंका नाही.
हेही वाचा-
राज्यभरात १ लिटरही दूध संकलित झालं नाही, राजू शेट्टींचा दावा
खड्ड्यात जावो जनता, आम्हाला नाही चिंता