महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (mns) जन्मच मराठी माणसाचे प्रश्न सोडवण्यासाठी झाला आहे आणि यापुढेही आम्ही ते करतच राहणार. मुंबई महापालिका निवडणुकीत कोणत्याही पक्षासोबत युती करण्याबद्दल अजून कोणतीही चर्चा झालेली नाही किंवा कोणताचा प्रस्ताव आमच्यासमोर नाही, असं खणखणीत प्रत्युत्तर मनसे नेते नितीन सरदेसाई (nitin sardesai) यांनी भाजपला दिलं आहे.
विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातील निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी सरकारमधील (maha vikas aghadi) शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येत भाजपचा धुव्वा उडवला. या निवडणुकांमधील रणनिती साफ चुकल्याची कबुली देखील विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली. त्यातच येऊ घातलेल्या मुंबई महापालिकेत (bmc) शिवसेना विरूद्ध भाजप असा उभा संघर्ष होणार असला, तरी शिवसेनेला काँग्रेस आणि राष्ट्रवादीची साथ मिळू शकते असं म्हटलं जात आहे. त्यामुळे भाजप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सोबत घेऊन महापालिका निवडणूक लढणार काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
हेही वाचा- येत्या १ मेपर्यंत समृद्धी महामार्गावरुन नागपूर ते शिर्डी प्रवास करता येणार- उद्धव ठाकरे
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जन्मच मराठी माणसाचे प्रश्न सोडवण्यासाठी झाला आहे आणि यापुढेही आम्ही ते करतच राहणार....
— Nitin Sardesai (@1nitinsardesai) December 7, 2020
निवडणुकीत कोणत्याही पक्षासोबत युतीबद्दल अजुन कोणतीही चर्चा अथवा प्रस्ताव नाही.https://t.co/GY7qMHH8CC
त्याबद्दल प्रसारमाध्यमांनी देवेंद्र फडणवीस यांना विचारलं असता, भाजप (bjp) हा राष्ट्रीय पक्ष आहे. आमची भूमिका व्यापक आहे. राज ठाकरे यांची मराठी माणसाकरीता असलेली भूमिका आम्हाला मान्य असली, तरी मराठी माणसांच्या हक्काकरीता लढताना अमराठी माणसाला वाळीत टाकणं आम्हाला मान्य नाही, असं फडणवीस (devendra fadnavis) म्हणाले होते.
त्याला प्रत्युत्तर देताना मनसेचा जन्म हा मराठी लोकांसाठी झाला आहे. त्यामुळं तो बाजूला ठेवला जाणार नाही. मराठीचा मुद्दा मनसे कधीही डावलणार नाही. असं असलं, तरी मनसेचं मराठीपण खूप व्यापक आहे. महाराष्ट्राच्या भूमिपूत्रांना त्यांचा हक्क मिळवून देणं, मराठी भाषेचा वापर करणं, महाराष्ट्रात राहणाऱ्या परप्रांतीयांनी देखील मराठी संस्कृतीचा आदर करणं, हा मनसेच्या मराठी मुद्द्याचा अर्थ आहे. जर हा मुद्दा कोणाच्या लक्षात आला नसेल तर यावर चर्चा होऊ शकते, असा टोला नितीन सरदेसाई यांनी भाजपला लगावला आहे.
मनसे आणि भाजपच्या या भूमिकेकडे पाहता मुंबई महापालिका निवडणुकीसाठी या दोन्ही पक्षांची युती होण्याबाबत राजकीय जाणकारांना साशंकता वाटत आहे.
(mns will continue to fight for marathi people says mns leader nitin sardesai)