राज्याला ड्रायव्हर नको जनतेचं हित बघणारा मुख्यमंत्री हवा आहे. मागच्या ४८ तासांत कोकणात इतका पाऊस पडला आहे की लोकांचे जीव धोक्यात आले आहेत. तरीही राज्य सरकारला कुठल्याही गोष्टीचं गांभीर्य नाही, अशा शब्दांत भाजप खासदार आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांच्यावर टीका केली.
कोकणातील पूरस्थितीवर नारायण राणे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी परिस्थितीची माहिती देतानाच मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, गेल्या ४८ तासांत कोकणात ३५० मिमीहून अधिक पाऊस पडला आहे. रत्नागिरी, रायगडसह संपूर्ण कोकणाला पुराचा मोठा फटका बसला आहे. परिसरात १०-१२ फूट पाणी साचल्यानं अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. अनेकांची घरं पाण्याखाली गेली आहेत. जनतेचा जीव धोक्यात आला आहे, तरीही राज्य सरकारला त्या गोष्टीचं गांभीर्य नाही.
हेही वाचा- हा’ तर अतिवृष्टीच्या पलिकडचा पाऊस- उद्धव ठाकरे
मुसळधार पाऊस पडला की कोकणात पूरस्थिती निर्माण होते. हवामान खात्याने आधीच अंदाज वर्तवलेला असताना राज्य सरकारकडून वेळीच उपाययोजना होणं गरजेचं होतं. परंतु प्रशासनाला योग्य ते निर्देश सरकारकडून देण्यात आले नाही. कारण या गोष्टीचं गांभीर्यच त्यांना नाही.
मुख्यमंत्र्यांना माणुसकी आहे का? गाडी चालवत ते पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी गेले. परंतु चेंबूर, विक्रोळीला अतिवृष्टीनं जी घरं कोसळली, त्यातील मृतांच्या कुटुंबीयांचं सांत्वन करण्यासाठी गेले नाहीत? राज्याला ड्रायव्हर नको, लोकांचं हित जपणारा मुख्यमंत्री हवा आहे. शासनाकडे हजारो ड्रायव्हर आहेत. गाडी चालवायची असेल, तर कॅबिनेटला जा, मंत्रालयात जाऊन काम करा. राज्यात अतिशय गंभीर परिस्थिती आहे. विकासकामे ठप्प आहेत, अशा शब्दांत नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.
हेलिकॉप्टर, बोटीच्या सहाय्याने लोकांना वाचवणं गरजेचे आहे. लोकांना अन्नपुरवठा करणं, सुरक्षितस्थळी नेणं गरजेचं आहे. हेलिकॉप्टर, बोटी, सैन्याची मदत केंद्राकडून करण्यात येत आहे. केंद्राकडून कोकणाला आवश्यक ती मदत पुरवण्यात येत आहे. लोकांना वाचवण्यासाठी रेस्क्यू टीम कार्यरत आहेत. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांची बोलून मी केंद्रीय मंत्री नित्यानंद रॉय यांच्याशी बोललेलो आहे. केंद्र सरकार आवश्यक ती मदत करेल अशी माहिती केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिली आहे.