राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी गणेश नाईक यांना सर्वकाही दिलं, पण नाईक यांनी नवी मुंबई शहराचा विकास करण्याऐवजी फक्त स्वत:च्या कुटुंबाचाच विकास केला. एक ना एक दिवस नाईक पक्ष सोडून जातील, याची पक्षाला कल्पना देऊनही पक्षाने माझ्यावर विश्वास ठेवला नाही. गणेश नाईकांनी पक्ष खड्ड्यात घातला, माती टाकली आणि त्यावर उभे राहीले. त्यांनी पक्ष अत्यंत पद्धरशीरपणे संपवला, घणाघाती टीका राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सरचिटणीस जितेंद्र आव्हाड यांनी गणेश नाईक यांच्यावर मंगळवारी केली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गणेश नाईक लवकरच भाजपात प्रवेश करतील अशी चर्चा रंगली आहे. सध्या नवी मुंबई महापालिकेत राष्ट्रवादीची सत्ता आहे. परंतु लोकसभा निवडणुकीत घटलेली मतदानाची टक्केवारी पाहता, येत्या विधानसभा आणि महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीला पुन्हा सत्ता मिळणं मुश्कील असल्याचं राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचं मत आहे. त्यामुळे महापौर आनंद सुतार यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत राष्ट्रवादीच्या ५२ नगरसेवकांनी भाजपात जाण्याच्या निर्णयावर सोमवारी संध्याकाळी शिक्कामोर्तब केलं. या निर्णयाची गणेश नाईक लवकरच घोषणा करण्याची शक्यता आहे.
नवी मुंबईतील राष्ट्रवादीचे मातब्बर नेते अशी गणेश नाईक यांची ओळख आहे. परंतु सत्तेच्या लालसेपोटी सचिन अहिर, चित्रा वाघ, मधुकर पिचड यांच्यापाठोपाठ नाईक देखील पक्ष सोडत असल्याने पक्षातील राष्ट्रवादीचे इतर नेते चांगलेच संतापले आहेत.
त्यावर प्रतिक्रिया देताना आव्हाड म्हणाले की, गणेश नाईक ५ वर्षांत पक्ष साफ करतील आणि ऐनवेळी सोडून जातील, अशी मी पक्षाला २०१४ मध्येच कल्पना दिली होती. पण दुर्दैवाने पक्षाने माझ्या म्हणण्याकडे लक्ष दिलं नाही. उलट नाईक गद्दारी करणार नाही, हे पत्रकार परिषद घेऊन सांग, अशा सूचना मला शरद पवारांनीच दिल्या होत्या.
कल्याण डोंबिवली, मिरा भाईंदरमध्ये सत्ता असताना तसंच भिवंडीत ताकद असतानाही राष्ट्रवादीचा एकही नगरसेवक नाही. या सगळ्याची जबाबदारी कोणावर होती, तर गणेश नाईक यांच्यावर होती. कारण पक्षात जी काही फाटाफूट व्हायची त्यामागे नाईक यांचीच ताकद असायची.
पवारांनी गणेश नाईक यांना सर्वकाही दिलं. पण त्यांनी फक्त स्वत:च्या कुटुंबाचा विकास केला. विकास म्हणजे घरच्यांचा विकास करायचा नसतो. सागर नाईक, ज्ञानेश्वर नाईक, तुकाराम नाईक, संजीव नाईक, संदीप नाईक स्वत: गणेश नाईक हे सगळेजण नवी मुंबईतील सत्तेच्या केंद्रस्थानी आहेत. स्वत:च्या कुटुंबाशिवाय नाईकांनी नवी मुंबईत ठेवलंय काय? असा प्रश्नही उपस्थित केला.
पक्षाला गरज असताना नाईक एक ना एक दिवस पक्ष खड्ड्यात घालणार, त्यावर माती टाकून उभे राहणार हे मला माहिती होतं, पण पक्षाला सांगूनही त्यांनी माझ्याकडे दुर्लक्ष केलं हीच खंत वाटते. काहीही असलं, तरी पक्ष पुन्हा एकदा उभा करु आणि त्याची सुरुवात नवी मुंबईतूनच करु असा निर्धार जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी व्यक्त केला.
हेही वाचा
‘त्यांचं’ ठरलं ! राष्ट्रवादीचे ५२ नगरसेवक जाणार भाजपात
राष्ट्रवादीला नवी मुंबईतही खिंडार, गणेश नाईक भाजपाच्या वाटेवर?