सध्या विराेधकांकडून राज्यातील धार्मिक स्थळं उघडण्याची मागणी अत्यंत जोरदारपणे केली जाऊ लागली आहे. राज्य सरकारने दारूची दुकानं उघडायला जेवढा उत्साह दाखवला, त्याच्या अर्धा उत्साह तरी मंदिरं उघडायला दाखवा, असा सल्ला भाजप नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारला दिला आहे. (open all temples in maharashtra demands opposition leader devendra fadnavis)
कोल्हापूर दौऱ्यादरम्यान प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीस यांनी हे वक्तव्य केलं. ते म्हणाले, दारूची दुकाने उघडण्याने काय होतं आणि मंदिरं खुली केल्याने काय होतं, हे सर्वांना कळतं. जो उत्साह दारूची दुकाने उघताना दाखविला, त्यातील अर्धा उत्साह तरी मंदिरं उघडण्यासाठी सरकारने दाखवायला हवा. प्रशासनापेक्षा शासनाने अधिक लक्ष देण्याची गरज आहे. शासन ज्या पद्धतीने चालतं, त्याच पद्धतीने साधारणत: प्रशासन पुढे जात असतं. सरकार आणि मंत्री लक्ष घालतील, तेव्हाच निर्णय प्रक्रियेला वेग येईल, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारच्या कार्यपद्धतीवर देखील बोट ठेवलं.
हेही वाचा - Raj Thackeray: मॉल उघडले तर मंदिरं का नाहीत?- राज ठाकरे
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व धर्मियांची प्रार्थनास्थळे सर्वसामान्यांसाठी मार्च महिन्यापासून बंद ठेवण्यात आलेली आहेत. त्यातच आर्थिक व्यवहारांना चालना देण्यासाठी राज्य सरकार माॅलपासून बाजारपेठा ते इतर उद्योगधंद्यांना अटी-शर्थींच्या आधारे परवानगी देत असताना प्रार्थना स्थळं उघडण्यास परवानगी का नाही? असा प्रश्न सातत्याने भाविकांकडून उपस्थित करण्यात येत आहे. सरकारने परवानगी न दिल्यास आंदोलन करू असा पवित्राही घेतला जात आहे. एमआयएम या पक्षाचे खासदार इम्तियाज जलिल यांनी देखील सरकारने परवानगी दिली नाही, तरी २ सप्टेंबरपासून मशिद उघडणार, असं आव्हान ठाकरे सरकारला दिलं आहे.
सर्वोच्च न्यायालयाने जैन धर्मियांच्या पर्युषण काळात मुंबईतील ३ मंदिरे उघडण्यास परवानगी दिली होती. हाच धागा पकडत पंढरपूरमधील विठ्ठल मंदिर वारकऱ्यांसाठी उघडण्यात यावं अन्यथा वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली १ लाख वारकऱ्यांचं आंदोलन करण्यात येईल, असा इशारा वारकऱ्यांकडून सरकारला देण्यात आला आहे.
काही दिवसांपूर्वी नाशिकच्या त्र्यंबकेश्वर येथील काही पुजाऱ्यांनी मंदिरं खुली करण्याच्या मुद्द्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली होती. या भेटीत राज ठाकरे यांनी राज्यातील माॅल सुरू होऊ शकतात, तर मंदिरं का नाही? असा सवाल सरकारला केला होता. कोरोनासंदर्भातील सुरक्षा नियमांचं पालन करुन प्रार्थनास्थळे उघडण्याची परवानगी देण्यात यावी, असा सल्लाही त्यांनी दिला होता.
हेही वाचा - २ सप्टेंबरपासून मशिदी उघडणारच, इम्तियाज जलिल यांचं ठाकरे सरकारला आव्हान