राज्यातील पूर परिस्थिती लक्षात घेता राज्य सरकार महत्त्वाचा निर्णय घेणार आहे. ज्या गावांना समुद्राच्या पाण्याचा धोका आहे अशा ठिकाणी संरक्षण भिंत उभारणार आहेत. समुद्रकिनारी पूर परिस्थितीवर मात करण्यासाठी संरक्षण भिंत उभारली जाणार आहे.
समुद्राचे पाणी गावांमध्ये शिरून पूरपरिस्थिती निर्माण होऊ नये किंवा शेत जमिनी समुद्राच्या पाण्यानं खराब होऊ नये यासाठी संरक्षण भिंत बांधणार आहे. पाच जिल्ह्याच्या अनेक भागात जवळपास १७१ किलोमीटर संरक्षण भिंत बांधावी लागणार आहे.
यासाठी जवळपास १ हजार ६०० कोटी रुपयांचा निधी अपेक्षित आहे. येत्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर निर्णय होण्याची दाट शक्यता आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी ,रायगड, ठाणे आणि पालघर या ५ जिल्ह्यात ही संरक्षक भिंत उभारण्यात येणार आहे.
मुख्यमंत्र्यांनी सलग तीन दिवस पूरग्रस्त भागाचा दौरा केला. तुफान पावसानं हाहाकार माजवल्यानं राज्याच्या अनेक भागात मोठं नुकसान झालं आहे. रायगड जिल्ह्यातील तळीये गावात दरड कोसळून ५० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे.
तर चिपळूण, सातारा इथंही दरड दुर्घटना घडल्या. मुख्यमंत्र्यांनी रायगड आणि चिपळूणचा दौरा केला. त्यानंतर आज मुख्यमंत्री साताऱ्यातील कोयनानगरला जात होते. मात्र तुफान पावसामुळे हेलिकॉप्टर लँड होऊ शकत नसल्यानं, मुख्यमंत्री परत पुण्याला आले. तिथून ते मुंबईला परतले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांची वर्षा बंगल्यावर आपत्कालिन आढावा बैठक आयोजित केली. राज्याचे मुख्य सचिव आपत्कालिन विभागाचे अधिकारी आढावा बैठकीला उपस्थित आहेत. या बैठकीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मुख्य सचिव सीताराम कुंटे वर्षा बंगल्यावर उपस्थित आहेत.
हेही वाचा