वांद्रे - आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये शिवसेना स्वबळावर लढणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. मातोश्रीवर झालेल्या शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय झाला. स्थानिक स्वराज्य संस्थेबाबत निर्णय झाला असला तरीही मुंबई महापालिका निवडणुकीबाबत कोणतेही स्पष्ट असे निर्देश देण्यात आलेले नाहीत. त्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीत युती होणार की नाही याबाबत अद्यापही कोणतीही माहिती समजू शकलेली नाही.
"ही पक्ष संघटनेची बैठक होती, काही गोष्टी गोपनीय असतात. त्या गोपनीय राहू द्या," असं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सांगितलं. तसंच "आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीतील युतीबाबत चर्चा झाली. पण त्याबाबत उद्धव ठाकरे आपल्याशी संवाद साधतील. त्यामुळे याबाबत मी बोलणं उचित नाही," असं त्यांनी स्पष्ट केलं.