मुंबई - महापालिका निवडणूक होताच महापालिका आयुक्तांनी सहाय्यक आयुक्तांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. सात विद्यमान सहाय्यक आयुक्त यांच्या बदल्या करत आयुक्तांनी जल विभाग आणि एच पूर्व विभाग कार्यालयातील दोन कार्यकारी अभियंत्यांना सहाय्यक आयुक्त पदावर बढती दिली आहे.
महापालिका निवडणुका होऊन महापौर आणि उपमहापौर विराजमान होताच आयुक्तांनी सहाय्यक आयुक्तांच्या बदलीचे ऑर्डर जारी केलेत. यामध्ये आर- मध्य विभाग कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त किशोर गांधी यांची मुलुंड 'टी' विभागात बदली केली. निवडणूक सुरू होण्यापूर्वी गांधी यांची बदली आयुक्तांनी भाजपाच्या दाबावाखातर केली होती. परंतु येथील काँग्रेस, शिवसेना आणि मनसे यांनी आंदोलन करत तीव्र विरोध केल्यामुळे आयुक्तांना ही ऑर्डर रद्द करावी लागली होती. परंतु आता गांधी यांची बदली भाजपा गड समजल्या जाणाऱ्या मुलुंड टी वार्डातच केली आहे.
गांधी यांची बदली करून त्यांच्या जागी जल अभियंता विभागाचे कार्यकारी अभियंता यांना बढती देत त्यांची नियुक्ती केली आहे. तर वांद्रेसह सांताक्रूझ पूर्व परिसरातील अनधिकृत बांधकामे साफ करणाऱ्या डेमॉलिशन मॅन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रशांत गायकवाड यांची बदली अंधेरी पश्चिम भागातील के पश्चिम बिभागाच्या सहाय्यक आयुक्तपदी केली आहे. तर गायकवाड यांच्या जागी एच/ पूर्व विभागाचे कार्यकारी अभियंता गोविंद गारुळे यांना बढती देत त्यांच्यावर सोपवली आहे.
के पश्चिम विभागाचे सहाय्यक आयुक्त पराग मसुरकर यांची बदली मालमत्ता विभागात करून त्या विभागाचे सहाय्यक आयुक्त विश्वास शंकरवार यांच्याकडे अतिक्रमण विभाग(पूर्व उपनगरे)चा भार सोपवला आहे. जी दक्षिणच्या सहायक आयुक्त डॉ. भाग्यश्री कापसे यांची बदली घाटकोपर 'एन' विभागात केली आहे. त्यांच्या जागी मुलुंडच्या 'टी' विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रशांत सपकाळे यांना पाठवले आहे. तर घटकोपरच्या 'एन' विभागाचे सहाय्यक आयुक्त सुधांशू द्विवेदी यांच्याकडे नगर अभियंता विभागाचा भार सोपवला आहे.