मराठी भाषेचं काय होणार? याची चिंता कुणी करू नका. सर्वांना पुरुन उरेल आणि पुढे जाईल, असे सांगत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आमच्या मातृभाषेचा स्वाभिमान आम्ही बाळगायचा नाही, तर कुणी बाळगायचा असा सवाल मराठी भाषादिनी स्थानिय लोकाधिकार समितीतर्फे आयोजित वांद्रे रंगशारदा येथील कार्यक्रमात बोलतांना केला.
यावेळी त्यांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा नाकारणाऱ्या केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांच्या बोकांडी असा आणि हा दर्जा मिळवून आणा, असे आदेशच आपल्या खासदारांना दिले.
मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा पाठवल्या जात आहेत. शुभेच्छा संदेश मराठीत येत आहेत याचे समाधान वाटत आहे, असे सांगत महाराष्ट्राच्या राज्यपालांचे भाषण हे मराठीत होणार नसेल तर ते राज्य कसे मानायचे? असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला. याचसोबत त्यांनी स्थानीय लोकाधिकार समितीचे कौतुक करत, मराठी भाषेचा अभिमान स्थानिय लोकाधिकारने कायम ठेवला त्याचा आपल्याला अभिमान असल्याचं सांगितलं.
मराठी भाषेचं काय होणार याची चिंता काहीजण व्यक्त करत आहेत. पण याची याची चिंता करू नका. सर्वांना पुरून, उरेल आणि पुढे जाणार, असं सांगितलं. आज काहींना ५० वर्षांपूर्वीचे बाळासाहेब आठवत आहेत, असे दाखले देतच त्यांनी शरद पवारांचा आरक्षणाच्या मुद्दयाचा समाचार घेतला. पवार तुम्ही मुख्यमंत्री होतात! केंद्रात मंत्री होतात. त्यावेळी तुम्ही जाती पातीच्या राजकारणावर पोळ्या का भाजलात असा प्रश्न यावेळी उद्धव ठाकरेंनी विचारला.
मनोहर जोशी वगळता मराठी भाषेबद्दल कुणी कळवळा दाखवला नाही. शिक्षण मंत्री विनोद तावडे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुम्ही सुद्धा असे सांगत उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर मराठी मुद्यावरून नेम साधला. आमच्या मातृभाषेचा स्वाभिमान आम्ही बाळगायचा नाही तर कुणी बाळगायचा असा सवाल करतच त्यांनी चंद्रकात पाटील यांनी सिद्दरामय्याच्या मांडीवर जाऊन बसावे, असा उपरोधिक टोला मारला.
मराठी भाषेचा अभिमान सर्वांनीच बाळायला हवा. या मराठी भाषेचा अभिमान नसेल तर छत्रपतींचे नाव घेऊ नका. चालते व्हा त्या त्या भाषिक राज्यांमध्ये. तिथे इसीसचा धोका अंगावर येतोय आणि इथे मराठी शाळा बंद पडत आहेत. त्यामुळे सगळ्यांनी मिळून महाराष्ट्राला आधार देण्याची गरज असल्याचंही त्यांनी सांगितलं.
स्थिर सरकारची गरज होती म्हणून त्यावेळी प्रचार केला. पण आता अस्थिर सरकार गरजेचं आहे का असा सवाल करत मजबूत सरकार म्हणजे आता मेरी मर्जी असेच चालले असल्याचे टीका भाजपा सरकारवर केली. हे सरकार काढून अस्सल मराठमोळं, भगवं सरकार आणायला हवं, असं सांगताच एकच टाळ्यांचा कडकडाट झाला.
मराठी भाषा अभिजात दर्जा होऊ शकत नाही हे म्हणणारे राजनाथ सिंह तुम्ही कोण असा सवाल करत उद्धव ठाकरे यांनी हा अधिकार त्यांना द्यावाच लागेल, असे निक्षून सांगितलं. सर्व खासदार त्यांच्या बोकांडी बसा. देत नाहीत म्हणतात पण देत कसे नाहीत आणि घेतल्या शिवाय राहणार नाही, असे दाखवून द्या त्यांना, अशा शब्दांत खासदारांना सूचना केल्या.