मुंबईतील एसआरए घोटाळ्याप्रकरणी लोकायुक्तांनी ताशेरे ओढल्याने राज्याचे गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता चांगलेच अडचणीत आले आहेत. मेहता यांनी स्वत:हून राजीनामा द्यावा किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी विरोधकांनी केली आहे. यामुळे येणाऱ्या पावसाळी अधिवेशनात एसआरए घोटाळ्याचा मुद्दा चांगलाच गाजणार असल्याचं दिसत आहे.
ताडदेवमधील एम. पी मिल एसआरए प्रकल्प मंजूर करून विकासक ए. डी. कार्पोरेशनला ५०० कोटी रुपयांचा फायदा मिळवून दिल्याचा आरोप विरोधकांनी जुलै २०१७ रोजी पावसाळी अधिवेशनात केला होता. या घोटाळ्याप्रकरणी प्रकाश मेहतांचा राजीनामा घेण्याची मागणीही विरोधकांनी केली होती.
विरोधकांच्या मागणीनंतर मुख्यमंत्र्यांनी ६ सप्टेंबर २०१७ रोजी या प्रकरणाचा तपास लोकायुक्तांकडे सोपवला. त्यानुसार लोकायुक्तांनी या प्रकरणाची चौकशी करून आपला अहवाल राज्य सरकारला सादर केला आहे. या प्रकल्पाला मंजुरी देताना मुख्यमंत्र्यांना अवगत केल्याचा शेरा मेहता यांनी या प्रकरणाच्या फाईलवर मारला होता. प्रत्यक्षात मेहता यांनी याप्रकरणी मुख्यमंत्र्यांना अवगतच केलं नसल्याचं चौकशीत समोर आलं आहे.
त्यामुळे या अहवालात प्रकाश मेहता यांनी मंत्री म्हणून आपली जबाबदारी निष्पक्ष पार पाडली नसल्याचा ठपका लोकायुक्त न्यायमूर्ती एम.एल. ताहलीयानी ठेवला आहे. येत्या १७ जूनपासून राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. या अधिवेशनात सरकार हा अहवाल मांडण्याची शक्यता आहे. लोकायुक्तांच्या अहवालामुळे प्रकाश मेहता यांचं मंत्रीपद धोक्यात आलं आहे.
ताडेदव मिल कंपाऊंड घोटाळ्यात लोकायुक्तांनी तोशेरे ओढलेले गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनजंय मुंडे यांनी केली. एवढंच नाही, तर मेहता यांचा राजीनामा घेतल्याशिवाय आम्ही अधिवेशनाचं कामकाज चालू देणार नाही, असा इशाराही मुंडे यांनी दिला.
तर, मुख्यमंत्र्यांनी चौकशी आधीच मेहतांना क्लीन चिट दिली होती. परंतु चौकशीत सत्य समोर आलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्री आपल्या मंत्रिमंडळातील भ्रष्टाचारी मंत्र्यांची पाठराखण करायचं सोडून मेहता यांचा राजीनामा घेणार का? असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी केला आहे.
हेही वाचा-
शिवसेनेने दोन-तीन पदांसाठी युती केलेली नाही- उद्धव ठाकरे
मनसे स्वबळावर लढवणार विधानसभा?