महाराष्ट्र नवनिर्माण सेनेना व अॅमेझॉन यांच्यात मराठीच्या मुद्द्यावरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना न्यायालयाकडून नोटीस पाठवण्यात आली होती. त्यानंतर मनसैनिकांनी आक्रमक होत, राज्यभरातील अॅमेझॉनची कार्यालयं फोडण्याचा सपाटा सुरू केला होता.
अखेर अॅमेझॉनने आपल्या सर्व डिजिटल प्लॅटफॉर्मवर मराठी भाषेचा समावेश करण्याचं आश्वासन द्यावं लागलं. यासोबतच अॅमेझॉनकडून राज ठाकरेंची दिलगिरी व्यक्त करण्यात आल्याची माहिती समोर येेेत आहे.
या पार्श्वभूमीवर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विटरच्या माध्यमातून कार्यकर्त्यांचं अभिनंदन केलं. 'अमेझॉनला धडा शिकवला. सर्व महाराष्ट्र सैनिकांचे मनःपूर्वक अभिनंदन', अशा शब्दांमध्ये ट्विट करून संदीप देशपांडे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
मराठीच्या मुद्द्यावरुन मनसे प्रचंड आक्रमक झाली होती. राज्यभरात विविध ठिकाणची अॅमेझॉनची कार्यालयं फोडली गेली. मनसे कार्यकर्त्यांनी पुणे, मुंबई आणि वसईमधील अॅमेझॉनच्या कार्यालयात घुसून तोडफोड केली. तसेच, ‘मराठी नाय तर अॅमेझॉन नाय’ अशी घोषणाबाजी देखील मनसैनिकांकडून करण्यात आली.