पालघरच्या डहाणूमध्ये दोन साधू आणि एका ड्रायव्हरच्या हत्याप्रकरणाची उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही गंभीर दखल घेतली आहे. पोलिसांच्या डोळ्यादेखत या तिघांची हत्या करण्यात आल्याने योगींनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन करून या घटनेवर चर्चा केली. तसंच या हत्या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी देखील केली.
काय म्हणाले योगी?
या संदर्भातील माहिती योगी आदित्यनाथ यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून दिली आहे. यांत ते म्हणतात की, महाराष्ट्रातील पालघरमध्ये जुना आखाड्याचे स्वामी कल्पवृक्ष गिरी आणि स्वामी सुशील गिरी तसंच त्यांचा ड्रायव्हर नीलेश तेलगडे यांची दुर्दैवी हत्या करण्यात आली. या हत्या प्रकरणासंदर्भात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा केली आणि या घटनेतील जाबाबदार आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.
हेही वाचा- पालघर घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा देणार- मुख्यमंत्री
पालघर,महाराष्ट्र में हुई जूना अखाड़ा के सन्तों स्वामी कल्पवृक्ष गिरि जी, स्वामी सुशील गिरि जी व उनके ड्राइवर नीलेश तेलगड़े जी की हत्या के सम्बन्ध में कल शाम महाराष्ट्र के मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे जी से बात की और घटना के जिम्मेदार तत्वों के खिलाफ कठोर कार्रवाई हेतु आग्रह किया।
— Yogi Adityanath (@myogiadityanath) April 20, 2020
काय आहे प्रकरण?
गुरूवार मध्यरात्री दाभाडी-खानवेल मार्गावरून हे तिघेही आपल्या कारमधून नाशिकच्या त्र्यंबकेश्वरकडे जात होते. यावेळी शेकडो ग्रामस्थ रस्त्यावर जमा झाले. त्यांनी ही कार थांबवत प्रवाशांची विचारपूस करण्यास सुरुवात केली. मात्र प्रवाशांनी माहिती देण्याच्या आधीच काही लोकांनी गाडीच्या दिशेने दगडफेक सुरू केली. त्यानंतर या जमावाने कारमधील तिघांनाही चोर समजून लाठ्याकाठ्यांनी बेदम चोप दिला आणि त्यांना दगडाने ठेचून मारलं. ही घटना पालघरच्या डहाणू तालुक्यातील गडचिंचले इथं घडली होती.
या घटनेची माहिती मिळताच कासा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हा परिषद सदस्य काशिनाथ चौधरीही होते. या सर्वांनी जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, जमावाने शांत होण्याऐवजी पोलिसांच्या गाडीवरही हल्ला करत दगडफेक केली. यामध्ये एक पोलीस कर्मचारीही जखमी झाला. पोलिसांच्या उपस्थितीत ही घटना घडल्याने राज्यभर खळबळ उडाली होती.
हेही वाचा- पालघरमध्ये चोर समजून तिघांची दगडानं ठेचून हत्या
मुख्यमंत्र्यांचं आश्वासन
हे प्रकरण माध्यमांमध्ये प्रसिद्ध होताच मुख्यमंत्र्यांनी त्यावर खुलासा केला. पालघर इथं घडलेल्या घटनेवर कारवाई करण्यात आली आहे. ज्या दिवशी गुन्हा घडला, त्याच दिवशी पोलिसांनी २ साधू, १ ड्रायव्हर आणि पोलिस कर्मचार्यांवर हल्ला करणाऱ्या सर्व आरोपींना अटक केली आहे. या गुन्ह्यातील आणि लज्जास्पद कृत्यातील आरोपींना शक्य तितकी कडक शिक्षा करण्यात येईल, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं.